संगमनेरच्या सुपूत्राला काश्मिर खोर्‍यात वीरमरण! तंगधार क्षेत्रात होते तैनात; बुधवारी लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काश्मिर खोर्‍यातून 370 हटवल्यापासून अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करीत दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचे प्रयत्न आजही सुरुच आहेत. मात्र भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या जवानांकडून पाकिस्तानी रेंजर्सच्या कृत्याला सडेतोड उत्तर दिले जात असून लष्कराकडून पाकड्यांचे मनसुबे उधळले जात आहेत. पाकिस्तानच्या इराद्यांना धुळीस मिळवण्यासाठी सीमेवर भारतीय लष्कर डोळ्यात तेल घालून उभे आहे. अशातच तंगधार क्षेत्रातून दुर्दैवी घटना समोर आली असून सीमेवर तैनात असलेले भारतीय लष्कराचे हवालदार रामदास साहेबराव बढे यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. हवालदार बढे मूळचे संगमनेर तालुक्यातील मेंढवणचे रहिवासी असून त्यांचे पार्थिव खोर्‍यातून मुंबईला विमानाने पाठवण्यात आले असून उद्या बुधवारी (ता.26) मेंढवण या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

केंद्र सरकारने काश्मिर खोर्‍याला देण्यात आलेला विशेष दर्जा हटवल्यापासून पाकिस्तानच्या पोटात पोटशूळ उठले आहे. त्यातूनच त्यांच्याकडून वारंवार सीमेवर गोळीबार करीत दहशतवाद्यांना भारतीय हद्दित घुसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराकडून वारंवार पाकिस्तानकडून होणारे नापाक प्रयत्न धुळीस मिळवले जात असून या धुमश्‍चक्रीत अनेक दहशवाद्यांनाही कंठस्नान घातले जात आहे.

सोमवारी (ता.24) तंगधार सेक्टरमधील सीमेवरही पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार सुरु होता. त्याच्या आडून दहशवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न असल्याचे लष्कराला ठाऊक असल्याने भारतीय जवानही त्याला सडेतोड उत्तर देत होते. अशातच दुर्दैवाने तंगधार क्षेत्रात थेट नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या रामदास साहेबराव बढे यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांना वीरमरण प्राप्त झाले. हवालदार बढे मूळचे संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील रहिवाशी असून मंगळवारी लष्कराने त्यांच्या पार्थिवाला मानवंदना दिल्यानंतर विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला पाठवण्यात आले आहे. तेथून ते बुधवारी सकाळी संगमनेरकडे पाठवण्यात येईल.

बुधवारी (ता.26) सकाळी त्यांना त्यांच्या मेंढवणगावी लष्कराच्यावतीने अखेरची मानवंदना दिल्यानंतर संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी संगमनेरचे तहसीलदार धिरज मांजरे आपल्या पथकासह मेंढवणमध्ये असून लष्करी अधिकार्‍यांच्या सूचनांनुसार अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली आहे. शहीद रामदास बढे यांच्या पश्‍चात वृद्ध वीरमाता, पत्नी अकरावीत शिकणारी मुलगी, नववीत शिकणारा मुलगा आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.

Visits: 261 Today: 3 Total: 1105393

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *