तालुक्यातील 476 कोविड बळींना राज्याकडून सानुग्रह मदत! नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी पन्नास हजार; राहिलेल्यांची नोंदणी करण्याचे आवाहन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दीड वर्षाच्या कोविड कालावधीत संक्रमण होवून मृत्यू झालेल्यांच्या निकटच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती निधीतून प्रत्येकी पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने या कालावधीत कोविडने मृत्यू झालेल्या व राष्ट्रीय पोर्टलवर तशी नोंद करण्यात आलेल्या संगमनेर तालुक्यातील 476 जणांचे अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आले आहेत. या व्यतिरिक्तही कोविडने मृत्यू झालेल्यांपैकी कोणाची नोंदणी राहीली असल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

कोविड संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत राज्यातील अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. कोविडने मृत्यू झालेल्या नागरिकांना सानुग्रह आर्थिक मदत करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले होते. त्यानुसार केंद्राने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले होते. त्याच दरम्यान राज्यातील ज्या नागरिकांचा कोविड संक्रमणातून बळी गेला आहे, अशा नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनेही पथदर्शी निर्णय घेतला व राज्यातील कोविड बळी गेलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्‍यांना तालुकानिहाय पद्धतीने राज्य सरकारच्या पोर्टलवर नोंदी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील 7 हजार 137 नागरिकांचा बळी गेला. सरकारच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषदेच्या (आय.सी.एम.आर.) पोर्टलवर प्रत्येक तालुक्यात झालेल्या कोविड मृत्यूनुसार प्रस्ताव तयार करण्यासाठी तहसीलदार तथा घटना व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. या समितीने संगमनेर तालुक्यातील कोविड मृत्यू झालेल्यांच्या नोंदीनुसार गावनिहाय विभागणी करुन मयतांच्या जवळच्या नातेवाईकांचा शोध घेतला. अशा सर्व नातेवाईकांद्वारे आर्थिक मदतीसाठी राज्य सरकारने तयार केलेल्या पोर्टलवर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आय.सी.एम.आर. पोर्टलवर कोविड मृत्यूची नोंद झालेल्या जिल्ह्यातील 7 हजार 137 जणांपैकी चार हजार जणांचे तर संगमनेर तालुक्यातील सर्वच्या सर्व 476 जणांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय ज्या नागरिकांच्या कोविड मृत्यूची नोंद अद्यापही राष्ट्रीय पोर्टलवर झालेली नाही अशा मयताच्या नातेवाईकांनी अर्जदाराचा तपशील असलेला अर्ज, बँकेचा तपशिल, मृत्यू झालेल्या व्यक्तीचा तपशील, त्यांच्या जन्म व मृत्यूचे अधिकृत दाखले व इतर निकटच्या नातेवाईकांचे ना हरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रांसह नगर पालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सेतू कार्यालये अथवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या दीड वर्षाच्या कोविड संक्रमणात भारतीय आर्युविज्ञान अनुसंशोधन परिषदेच्या (आय.सी.एम.आर.) राष्ट्रीय पोर्टलवर संगमनेर तालुक्यातील 476 नागरिकांचा कोविडने मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार या सर्व मयतांच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्यांच्या मदतीचे अर्ज राज्य सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. याशिवाय ज्या मृतांची अद्यापही नोंद झालेली नसेल, अशा मयतांच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रांसह नगरपालिका, पंचायत समिती, तहसील अथवा सेतू कार्यालय किंवा आपापल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. आर्थिक मदत प्राप्त होण्यासाठी आवश्यक असलेली मदत देण्यासाठी प्रशासन तयार आहे.
– अमोल निकम
तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक

Visits: 259 Today: 2 Total: 1419042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *