आता यांच्यावर कोण नियंत्रण ठेवणार? देखभालीच्या नावाखाली वीज मंडळाकडून वृक्षांची मनमानी कत्तल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे राज्य शासन ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या सर्व स्तरावर पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन यासारख्या उपक्रमांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते, त्यासाठी शासनाकडून कोट्यावधीचा खर्चही केला जातो. दुसरीकडे त्याच सरकारातील एक महत्त्वाचा घटक असलेली राज्य वीज वितरण कंपनी मात्र याला अपवाद ठरली आहे. पावसाळ्यात संभाव्य अडथळा निर्माण करणारी झाडे छाटतांना वितरण कंपनीकडून झाडे छाटण्यासाठीच्या कोणत्याही मर्यादा पाळल्या जात नाहीत. एकीकडे दरवर्षी लाखों रुपये खर्च करुन झाडे लावली जातात, आसपासचे नागरीक त्याचे संवर्धन करतात, आणि वर्षभर मोठी झालेली झाडं वाहिन्यांना अडथळा ठरेल असा अंदाज बांधून मनमानी पद्धतीने छाटली जातात. हा प्रकार पर्यावरणप्रेमींना वेदनादायक ठरत असून यांच्यावर कोणीतरी नियंत्रण मिळवा हो! असा विरोधाचा सूर आता उभा राहु लागला आहे.


पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून जागतिकपातळीवर त्याचे प्रतिबिंब दिसत आहेत. वाढत्या शहरीकरणात आणि दळणवळणाच्या सुसज्ज जंगलांच्या जागा व्यापण्यासह विकासासाठी रस्त्यांची कारणे पुढे करुन दरवर्षी लाखों झाडांची कत्तल होते. पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतूदी आणि सर्वोच्च न्यायालयाने याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश बघता कत्तल झालेल्या झाडांच्या बदल्यात लावणे बंधनकारक असलेली झाडे प्रत्यक्षात लावली जातात का हे बघायला कोणताही कायदा किंवा यंत्रणा नसल्याने याच पोकळीचा फायदा घेवून ठेकेदार अधिकार्‍यांशी संगनमत करतात आणि कागदोपत्रीच वृक्षारोपनही होते, आणि झाडेही मोठी होतात.


यासर्व गोष्टींचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि जनजागृतीमुळे वृक्षसंवर्धनाबाबत जागृत झालेला समाज याचा परिणाम दरवर्षी पावसाळ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपनाचे कार्यक्रम होतात. संगमनेरातही दरवर्षी अशा कार्यक्रमांची मोठी भरमार असते. जनजागृतीमुळे लोकांना झाडांचे महत्त्व पटू लागल्याने आपल्या घरांच्या अथवा दुकानांच्या आसपास असलेल्या झाडांचे त्यांच्याकडून संवर्धन होवू लागले. त्यामुळे वाढत्या कॉक्रीटीकरणातून शहरातील कमी झालेली वृक्षसंख्या गेल्या काही वर्षात पुन्हा वाढली. नागरीकांकडून याबाबत अद्यापही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पुढेही ती वाढतच राहणार आहे.


मात्र या वाढीला आता सरकारचाच घटक असलेली वीज वितरण कंपनी अडसर ठरत आहे. नगरपालिका. सामाजिक संस्था, नागरीक यांनी लावलेली व संवर्धन करुन मोठी होत असलेली अनेक रस्त्यांवरची झाडे सध्या वीज वितरण कंपनीकडून छाटली जात आहेत. आगामी कालावधीत पावसासह वादळी वार्‍यांचे आगमन होणार असल्याने पूर्वतयारी म्हणून वितरण कंपनीकडून हे काम सुरु आहे. सदरचे काम आवश्यक असले तरीही त्याचा आधार घेवून कंपनीकडून झाडांची बेमालुमपणे तोड केली जात आहे. वाट्टेल तशा कुर्‍हाडी घालून नको तशी झाडे तोडली जात आहेत.


हे दृष्य पर्यावरणप्रेमींसाठी खुप वेदनादायक ठरत आहे. ज्या लोकांनी वर्ष- दोनवर्ष या झाडांना पाणी घातले, त्यांना जीव लावून मोठे केले त्यांच्या डोळ्यादेखत वितरण कंपनीचे आडहत्यारी माणसं वाट्टेल तशी त्यांची छाटणी करीत असल्याने नागरीकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. मेंटेनन्सच्या नावाखाली मिळालेल्या अधिकाराचा हा एकाप्रकारे गैरवापर असून पर्यावरणाविषयी वीज कंपनीची अनास्थाही यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.


अशाप्रकारच्या पर्यावरणीय गैरकृत्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वृक्षप्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून मुख्याधिकार्‍यांची असते. सध्या वीज वितरण कंपनीकडून मेंटेनन्सच्या नावाखाली शहरातील झाडांची मनमानी छाटणी सुरु आहे, त्याला आवर घालून आवश्यक असतील तेवढीच आणि व्यवस्थित पद्धतीने छाटणी कशी होईल, गरज नसतांनाही झाडांच्या फाद्या तोडल्या जाणार नाहीत याबाबत संबंधितांना ते आदेशित करतील अशी वृक्षप्रेमींना अपेक्षा आहे.

Visits: 185 Today: 1 Total: 1413649

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *