अरे देवा! चक्क माजी सभापतींच्या गिरणीलाच आकड्याची वीज! ठाण्याच्या भरारी पथकाची कारवाई; कारखान्याचा संचालक धावला तडजोडीला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सत्तेत असणार्या काहींना वैध अथवा अवैध अशा कोणत्याही मार्गाने पैसा मिळवण्याचे अथवा शासकीय साधनसंपत्तीचा मनमानी वापर करण्याचे व्यसनच जडलेले असते. त्यासाठी आपल्या राजकीय प्रतिष्ठेचाही पूरेपूर वापर केला जात असल्याची शेकडों उदाहरणे आपल्या आसपास असताना त्यात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. या धक्कादायक घटनेत मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या संगमनेर तालुक्यातील एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चक्क माजी सभापती महिलेनेच आपल्या राजकीय प्रतिष्ठेचा गैरवापर करुन वीज कंपनीच्या वाहिनीवरुन आपल्या गिरणीसाठी वीजचोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक अधिकार्याला हाताशी धरुन गेल्याकाही वर्षांपासून सुरु असलेल्या या उद्योगाबाबत ठाण्याच्या भरारी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे घालण्यात आलेल्या छाप्यातून वीजचोरीचा प्रकार उघड झाला असून पथकाने संबंधित माजी महिला सभापतीला चार लाख रुपयांचा दंड ठोठावल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या प्रकारानंतर सतत चर्चेत राहणार्या साखर कारखान्याच्या एका संचालकाने तडजोडीचाही प्रयत्न केल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत वीज चोरी रोखण्याची थेट जबाबदारी असलेल्या वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण ‘त्या’ गावचेच नसल्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या विषयीही संशय बळावला आहे.

याबाबत दैनिक नायकला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार गेल्या पंचवार्षिकमध्ये संगमनेर पंचायत समितीचे सभापतीपद भूषविणार्या महिलेकडून सदरचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सदर माजी महिला सभापतीची तालुक्यातील एका गावात गिरणी आहे. साधारणतः अशा कारणांसाठी अधिक दाबाने वीज पुरवठ्याची आवश्यकता असल्याने गिरण व्यवसाय करणार्यांना थ्री-फेज जोडणी घ्यावी लागते. त्याची मंजुरी देताना संबंधित विभागाचा कार्यकारी उपअभियंता प्रत्यक्ष स्थळ परिक्षण करुन नेमकी कोणती मशिनरी चालणार आहे, त्यासाठी सरासरी किती वीज खर्च होणार आहे याचे परिक्षण करुनच जोडणीला मंजुरी देत असतो. या प्रकरणातही असेच काही घडले असण्याची शक्यता आहे. मात्र या उपरांतही आजवर कधीही वीज कंपनीने या गिरणीची तपासणी केली नाही. त्यावरुन भाग दोनच्या उपकार्यकारी अधिकार्याचे अशाप्रकारच्या वीजचोरी उद्योगाला थेट समर्थन असल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

गिरणीचा व्यवसाय करणारी सदरची महिला एका मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित असून याच पक्षाचे तालुक्यातील बहुतेक सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व आहे. त्यातूनच या महिलेची पंचायत समितीच्या सभापतीपदावर वर्णी लागली होती. आपल्या कार्यकाळात सामान्य शेतकर्यांसाठी फारकाही करु न शकणार्या या सभापती महोदयांनी आपल्या दीर्घकालीन उदरनिर्वाहाची मात्र पद्धतशीर तजबीज करुन ठेवल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे. आपल्या राजकीय प्रतिष्ठेचा पूरेपूर वापर करताना या महिलेने नावासाठी वीज कंपनीची मीटर जोडणी घेतली. प्रत्यक्षात मात्र मीटरऐवजी त्यांचा संपूर्ण व्यवसाय चक्क वीज कंपनीच्या वाहिन्यांवर थेट ‘आकडा’ टाकूनच सुरु होता. गावातील अनेकांना हा प्रकार माहिती असूनही या भागातील उपकार्यकारी अभियंत्याच्या कामकाजाची पद्धत माहिती असल्याने कोणीही बोलत नव्हते.

मात्र संगमनेरात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता काहीप्रमाणात अशाप्रकारच्या गैरप्रकारांबाबत लोकांमधून विरोधाचे स्वर उमटू लागले असून वीजचोरीचा हा प्रकारही त्यातूनच उघड झाला आहे. गेल्या मोठ्या काळापासून राजरोसपणे सुरु असलेल्या या प्रकाराबाबत कोणीतरी अज्ञाताने थेट कळव्यात (जि.ठाणे) असलेल्या वीज कंपनीच्या मुख्यालयाला वीजचोरीची माहिती दिली. त्यानुसार आठजणांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास येवून ‘त्या’ गिरणीवर छापा घातला. यावेळी तेथे हजर असलेल्या मुलाकडे वीजबिलांची मागणी केल्यानंतर गैरप्रकार सुरु असल्याचा पथकाचा संशय बळावला आणि त्यांनी गिरणीसाठी आलेल्या वीज वाहिनीची तपासणी केली असता चक्क कंपनीच्या वाहिनीवरुन कोणत्याही मोबदल्याशिवाय बिनधास्त वीज चोरली जात असल्याचे त्यांना दिसून आले.

याबाबत भरारी पथकाने वीज कंपनीच्या प्रचलित नियमानुसार संबंधित माजी महिला सभापतींना दोन वर्षांच्या वापरापोटी सुमारे चार लाखांहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला असून या कारवाईचे वृत्त समजताच नेहमी चर्चेत असलेल्या साखर कारखान्याच्या एका संचालकाने घटनास्थळी धाव घेत तडजोडीचा प्रयत्न केला. मात्र भरारीपथक गोपनीय माहितीच्या आधाराने थेट ठाण्याहून आले असल्याने ‘त्या’ संचालकाला पथकाकडून कोणतीही दाद मिळाली नाही. मात्र त्यानंतर अशा प्रकारांच्या मूळाशी असलेल्या वीज कंपनीच्या भाग दोनच्या उपकार्यकारी अभियंत्याची मात्र सभापतींना दिलासा मिळवून देण्यासाठी चांगलीच धावपळ झाल्याची चर्चा आहे. त्यातून माध्यमांनी या महाशयांना कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नालाही त्याने चक्क ‘माहिती घेवून सांगतो, अद्याप माहिती नाही, आमच्यापर्यंत काहीच नाही..’ अशी उडवाउडवी करीत टाळण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन या अधिकार्याचाही या प्रकरणात ‘हात’ असल्याचे स्पष्ट असून माजी सभापतींसह त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. संगमनेर पंचायत समितीचे सभापतीपद भूषविलेल्या व्यक्तिनेच वीजचोरी केल्याचा प्रकार समोर आल्याने संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या आहेत.

भ्रष्टाचाराचे कुरण असलेल्या वीज वितरण कंपनीत पैसे कमावण्यासाठी अधिकारीच वेगवेगळे फंडे वापरत असतात. त्यात वीजचोरीचाही प्रकार आहे. शेतीपंपासाठी वीज मिळत नसल्याने मेटाकूटीला आलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. मात्र उपकार्यकारी अभियंत्याकडून अशाप्रकारे वीजचोरी करणार्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार अतिशय संतापजनक असून भाग दोनच्या या उपअभियंत्याची सखेाल चौकशी होवून त्याच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. विशेष म्हणजे परिसरातील शेतकर्यांना जनरल डायरसारखा दरडावणार्या या उपअभियंत्याबाबत पालकमंत्र्यांसमोरच तक्रारींचा पाढा वाचण्यात आला होता. त्यावरुन त्यांची तालुक्यातून तत्काळ हकालपट्टी होण्याची गरज असताना पालकमंत्र्यांनी त्याचा भरबैठकीत पानउतारा करीत त्याला ‘शेवटची संधी’ अशा शब्दात सुनावले होते. त्या उपरांतही सदरचा प्रकार समोर आल्याने हा अभियंता तालुक्यात कामाचाच नसल्याचे शेतकर्यांमधून बोलले जावू लागले असून पालकमंत्र्यांनी त्यांला तत्काळ येथून हटवण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

