आता रायतेवाडीतील घनकचरा प्रकरण पेटण्याची शक्यता! आक्रमक ग्रामस्थांनी वाहने रोखली; पालिकेचे मात्र कानावर हात..

नायक वृत्तसंस्था, संगमनेर
नगरपालिकेच्या दैनंदिन घनकचरा विरोधात गेली अनेक दशके संगमनेर खुर्द गावचा वाद सुरु असताना आता त्यात रायतेवाडीनेही उडी घेतली आहे. गेल्या वर्षभर विविध पातळ्यांवर तक्रारी करुनही पालिकेचा कचरा ठेकेदार रात्रीच्या अंधारात रायतेवाडी शिवारात चक्क खासगी जागेतच कचर्याच्या गाड्या रिकाम्या करीत असल्याने रायतेवाडीचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही ठेकेदार कोणालाही जुमानीत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी रात्री कचरा टाकण्यासाठी आलेल्या सर्व गाड्या अडवून त्या पुन्हा पाठवून दिल्या. यावेळी काहीसा तणावही निर्माण झाला होता. या प्रकाराबाबत पालिकेला कोणतीही कल्पना नसून संबंधित ठेकेदार परस्पर रायतेवाडी शिवारात कचरा नेवून टाकीत असल्याचेही यातून समोर आले आहे.

संगमनेर शहराच्या विविध भागातून दररोज जमा केला जाणारा कचरा पूर्वीपासून संगमनेर खुर्द येथील पालिकेच्या कंपोस्ट डेपोमध्ये साठविला जातो. पूर्वी या कचर्यावर प्रक्रिया करताना केवळ खड्डे घेवून तो मर्यादित कालावधीसाठी गाडला जात व नंतर बाहेर काढून खत म्हणून त्याची खुल्याने विक्री होत असत. मात्र यासर्व प्रक्रियेत त्यातून सुटणारी दुर्गंधी कोठेही कमी होत नसे व त्यातच वर्षोनुवर्षे खड्डा आणि कचरा हेच सूत्र राबविले गेल्याने या कचर्याचा जमिनीत निचरा होवून आसपासच्या जलस्रोतांचे पाणीही दुषीत झाल्याने संपूर्ण संगमनेर खुर्दने गेल्या काही वर्षात मोठे आंदोलन उभे केले.

त्यातही येथील कंपोस्ट डेपोला संरक्षक भिंती नसल्याने कचर्यात जमा झालेले कत्तलखान्यांमधील पशूंचे अवशेष खाण्यासाठी या भागात भटक्या श्वानांच्या टोळ्या निर्माण झाल्या होत्या. त्यातून या टोळ्यांमध्ये वर्चस्वावरुन एकसारखा संघर्ष होत राहिल्याने त्याचा परिणाम या भागातून दुचाकीवर जाणार्यांना कुत्रे अडवे गेल्याने असंख्य अपघात झाले. त्यात अनेकांचे बळी गेले, तर अनेकांना शारीरिक नुकसानही सोसावे लागले. यासर्व घटनांनी संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांना लढण्याचे बळ दिले आणि त्याचा परिणाम पालिकेने येथील कंपोस्ट डेपो बंदिस्त करण्यासह जमा होणार्या कचर्याचे योग्य वर्गीकरण व प्रक्रीया करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुरु केल्याने येथील दुर्गंधी मोठ्या प्रमाणात कमी झाली.

मात्र याउपरांतही संगमनेर खुर्दच्या नागरिकांनी नव्याने कचरा साठवण्यास विरोध सुरु केल्याने आंदोलनाच्या कालावधीत पालिकेकडून पर्यायी व्यवस्था म्हणून रायतेवाडी शिवारात कचरा टाकला जात असत. या कचर्यात संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यांतील जनावरांचे अनावश्यक अवशेष व अन्य गोष्टीही असल्याने दुर्गंधीची तीव्रता अधिक असते. त्यामुळे संगमनेर खुर्दच्या नागरिकांनी पालिकेला निवेदन देवून कोणत्याही स्थितीत कत्तलखान्यांमधील घाण अथवा पोलीस कारवाईत जप्त केलेल्या गोवंश मांसाची संगमनेर खुर्दच्या हद्दित विल्हेवाट लावू देणार नसल्याचा निर्धार केला. तेव्हापासून येथील कंपोस्ट डेपामध्ये अशा प्रकारचा कचरा अथवा जप्त मांसाची विल्हेवाट लावली जात नाही.

सततच्या पोलीस कारवायांमुळे संगमनेरातील अशा बेकायदा कत्तलखान्यांचे कंबरडे मोडलेले आहे. मात्र चोरुन-लपून किरकोळ स्वरुपात असे प्रकार घडत असल्याने त्यातून निघणारा कचरा कोठेही टाकल्यास अशा कत्तलखान्यांचे बिंग फुटेल. यासाठी संबंधित कत्तलखाना चालक कचरा ठेकेदाराला हाताशी धरुन परस्पर ‘त्या’ घाणीची विल्हेवाट लावत असल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. एकतर संगमनेर खुर्दच्या लोकांचा विरोध आणि त्यात कत्तलखाना चालकांशी संधान यामुळे पालिकेकडून सूचना नसतानाही संबंधित कचरा ठेकेदार परस्पर रायतेवाडी शिवारात अशा कचर्याची विल्हेवाट तर लावीत नाही ना? असा संशयही यातून निर्माण झाला आहे.

रात्रीच्या अंधारात चालणारा हा खेळ सोमवारी (ता.14) रात्री रायतेवाडी ग्रामस्थांनी बंद पाडला. यावेळी घंटागाड्यांचे चालक व ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात हमरीतुमरीही झाली. मात्र ग्रामस्थ काहीही ऐकण्याच्या तयारीत नसल्याने कचरा न फेकताच घंटागाड्यांना माघारी फिरावे लागले. खरेतर यापूर्वी संगमनेर खुर्दमध्ये झालेल्या अशा प्रकारानंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कंपोस्ट डेपोवर धावायची. आश्चर्य म्हणजे रात्री घडलेल्या रायतेवाडीतील घटनेबाबत मात्र पालिकेचे प्रशासन प्रमुख असलेल्या मुख्याधिकार्यांना कोणतीच कल्पना नसल्याचे समोर आले. त्यावरुन ठेकेदार आणि कत्तलखाना चालकांचा ‘रात्रीस खेळ’ सुरु असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे.

खरेतर गेल्या दीड वर्षांपासून रायतेवाडीतील साईराम ढोमसे व रवींद्र ढोमसे यांच्या ओढ्याच्या काठावरील खासगी जमिनीत सदरचा कचरा टाकला जात असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यावरुन रायतेवाडी ग्रामपंचायतीने वर्षभरापूर्वी पालिकेशी पत्रव्यवहारही केला होता. त्या उपरांतही हा प्रकार सुरुच राहील्याने वरील दोघांनी राज्य शासनाच्या ‘आपलं सरकार’ पोर्टलवरही तक्रार केली, त्यावर पालिकेकडून लेखी उत्तरही देण्यात आले होते. या उत्तरात रायतेवाडीत पालिकेकडून कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जात नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पालिका जर कचरा टाकत नसेल तर मग ठेकेदार नेमक्या कोणाच्या कचर्याची विल्हेवाट लावतोय याबाबत शंका निर्माण झाली आहे.

संगमनेर खुर्दच्या आंदोलनानंतर पालिकेने लाखों रुपये खर्च करुन आपल्या कंपोस्ट डेपोचे उद्यानात रुपांतर केले. सध्या या डेपोतून दुर्गंधी अथवा दुषीत पाण्याच्या निचर्याबाबतच्या तक्रारी शून्य झाल्या आहेत. अर्थात येथील कचरा डेपो हलवावा ही संगमनेर खुर्दच्या ग्रामस्थांची मागणी आजही कायम असली तरीही डेपोतील कचरा जमा करण्याबाबत सध्यातरी विरोध नसल्याने कचरा ठेकेदार रायतेवाडी शिवारात कचरा का टाकतोय? हा प्रश्न आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना रायतेवाडीत सोमवारी रात्री घडलेल्या प्रकाराची माहितीच नसल्याचे समोर आले. यामुळे कचरा ठेकेदारावरील संशय बळावला आहे.

