महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यानंतर आता माजीमंत्री बाळासाहेब थोरातही पोलीस ठाण्यात..! आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील वाद; शहर पोलीस ठाणे निवडणुकीच्या केंद्रस्थानी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या धांदरफळ मधील सभेच्या मंचावरुन वसंत देशमुख नामक कथीत पुढाऱ्याने केलेल्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या संतापाचा परिणाम विखे समर्थकांच्या गाड्या फोडण्यात झाल्यानंतर अनेकांवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल झाले. त्यातून एकमेकांवर दहशतीचे आरोप सुरु असतानाच आज दुपारी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी जुन्या वादाचा राग मनात धरुन भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांच्या श्रीमुखात भडकवण्यासह त्यांना धक्काबुक्की करीत मारहाण केल्याने संगमनेरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेल्या गणपुले यांना पाठिंबा देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील थेट पोलीस ठाण्यात गेले होते. आता दहशतच्या आरोप करीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही अमोल कतारी यांच्या समर्थनार्थ थेट पोलीस निरीक्षकांच्या दालनात पोहोचले. विशेष म्हणजे थोरात यांच्या चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत एखाद्या फौजदारी प्रकरणात त्यांनी पोलिस ठाण्याची पायरी चढण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा.
आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नवीननगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनाजवळ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी जुन्या वादाचा राग मनात धरुन एका टपरीवर चहा घेत असलेले भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांच्या पाठीमागून जात त्यांच्या कानशिलात भडकावली. यावेळी दोघात काही वेळ हमरीतुमरीही झाली. एकमेकांना धक्काबुक्की सुरु असतानाच एका पोलीस कर्मचाऱ्यांने त्यांच्यातील वाद मिटवून कतारींना तेथून काढून दिले. या घटनेनंतर गणपुले शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. हे वृत्त समजतात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही थेट शहर पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व कठोर कारवाईच्या सूचना देत दोषींना अटक करण्याची मागणी केली.
या घटनेनंतर सायंकाळी सातच्या सुमारास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. थोरात यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची भेट घेऊन संगमनेर तालुक्यात यापूर्वी कधीही राजकीय वाद अथवा तणावाच्या घटना घडलेल्या नाहीत याकडे त्यांचे लक्ष वेधले. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांमध्येही येथे सौहार्दाचे वातावरण असल्याचे सांगत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी निष्पक्षपणे कायद्याचे पालन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या घटनेने यंदा पोलीस ठाणे विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आल्याचे चित्र दिसत आहे.
Visits: 42 Today: 1 Total: 114129

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *