सेनेच्या माजी शहरप्रमुखांनी भाजप शहराध्यक्षकांच्या ‘श्रीमुखात’ भडकावली! पूर्ववैमनस्यातून घडली घटना; राधाकृष्ण विखे पाटील थेट पोलीस ठाण्यात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दशकभरापासून एकमेकांचे राजकीय वैरी म्हणून ओळखल्या जाणार्या शहरातील दोन राजकीय पक्षाच्या आजी-माजी शहरप्रमुखां मधील कटुता आज विकोपाला गेली. पूर्ववैमनस्यातून पंधरवड्यापूर्वी एकमेकांच्या विरोधात सोशल माध्यमात शितोंडे उडवण्याचे निमित्त होवून आजवर शांत असलेल्या या वादाला हिंसात्मक दिशा मिळाली. विधानसभेचे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम घटीका असल्याने पोलिसांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्राहकांची मोठी वर्दळ असलेल्या प्रशासकीय भवनाजवळ भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले बसलेले असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी शहराप्रमुख अमर कतारी यांनी पाठीमागून येत काहीही न बोलता त्यांच्या श्रीमुखात भडकावली. यावेळी गणपुले यांच्या हातात चहाचा पेला असल्याने त्यातील सगळा चहा त्याच्या कपड्यावर सांडला. या घटनेनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता गणपुले थेट शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर काही वेळातच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनीही पोलीस ठाण्यात येवून दोषीला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेने शहराच्या राजकारणाला आणखी एक कलाटणी दिली आहे.
याबाबत विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा अवधी असताना महायुतीकडून अमोल खताळ यांनी अर्ज दाखल केला. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित होते. ते तेथून रवाना झाल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले प्रशासकीय भवनाजवळील एका चहाच्या दुकानावर गेले. तेथे चहा घेत असताना अचानक तेथे आलेल्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी शहरप्रमुख तेथे आले आणि त्यांनी कोणाला काहीही समजण्यापूर्वीच गणपुले यांच्या कानशिलात भडकावली. नेमकं त्यावेळी त्यांच्या हातात चहाचा पेला होता व ते इतरांशी बोलत होते. अचानक घडलेल्या या प्रकाराने पेल्यातील सगळा चहा त्यांच्या कपड्यांवर सांडला.
या प्रकारानंतर काही क्षण तेथेच थांबूनही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर ते थेट शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. या घटनेची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी लागलीच थेट शहर पोलीस ठाण्यात जावून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. दोषींवर कठोर कलमान्वये कारवाई करुन त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या सन्मृख केली. यावेळी पोलिसांकडून कायद्याचे योग्य पद्धतीने पालन केली जाईल अशी ग्वाही या द्वयींनी दिली.
सध्या शहर पोलीस ठाण्यात श्रीराम गणपुले यांच्याकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून सदरची घटना एका पोलीस कर्मचार्याच्या समक्ष घडल्याची जोरदार चर्चा आहे. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही अधिकार्यांशी बोलताना त्याचा उल्लेख केला आहे. सदर कर्मचार्याने आरोपीला तत्काळ ताब्यात घेणं अपेक्षित असताना त्याने त्याला तेथून काढून देण्याची कृती संशयास्पद असल्याचेही त्यांनी पोलीस उपअधिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मंत्री विखे यांनी चिखली जळीत प्रकरणातील आरोपी शहरात खुलेआम फिरत असतानाही त्यांना अद्याप अटक का होत नाही असा संतप्त सवालही अधिकार्यांना विचारला, पोलिसांना ते सापडत नसतील तर, आम्ही पकडून हजर करतो असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकाराने गेल्या आठवड्यातील प्रकरणाला पुन्हा हवा मिळण्यासह आज घडलेल्या घटनेचं गांभीर्यही वाढले आहे.