मंगळापूरमध्ये दूध उत्पादकांचे अनोखे आंदोलन; गाढवाला पुष्पहार घालून दूध पाजले गायीच्या दुधाला 35 तर म्हशीच्या दुधाला 60 रुपयांचा दर देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे गायीच्या दुधाला 35 रुपये व म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारी (ता.9) मंगळापूर (ता. संगमनेर) येथे गाढवाला पुष्पहार घालून दूध पाजले. या अनोख्या आंदोलनातून संघटनेने राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दूध खरेदीचे दर सातत्याने कमी केले जात असल्याने राज्यतील दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहे. ही अनिश्चितता काही प्रमाणात कमी व्हावी व दुग्ध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कायमच संघर्ष करत आलो आहोत. मात्र, सरकार सतत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. या आंदोलनांचा परिणाम म्हणून दुग्धविकास मंत्र्यांनी शेतकरी प्रतिनिधी व दूध प्रक्रियादार यांची बैठक घेत लक्ष घालण्याचे मान्य केले. तसेच दुधाला एफआरपी मिळण्याकामी कॅबिनेट नोट बनविण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. परंतु, ती वेगाने पूर्ण करणे गरजेची आहे.

याचबरोबर गायीच्या दुधाला 35 रुपये तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव मिळावा, लॉकडाऊन काळात दूध कंपन्यांनी शेतकर्‍यांकडून 20 रुपये दराने दूध घेतले. यात मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पाच रुपये अनुदान द्यावे, लूटमार थांबविण्यासाठी खासगी व सहकारी दूध संघांसाठी कायदा तयार करावा, किमान आधारभाव आणि रेव्हेन्यू शेअरिंग संरक्षण लागू करावे, अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारावे, भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करुन ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात देण्यासाठी कायदेशीर हमी द्यावी, दूध संस्थांना प्रमाणित मिल्को मीटर वापरणे बंधनकारक करुन तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकाची नेमणूक करावी, शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरू करावी आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. हे आंदोलन सोमवारपासून 11 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक वाळे, रमेश पवार, सोमनाथ भोकनळ, अशोक वाळे, भानुदास गोरे, शिवाजी वाळे, ज्ञानदेव पवार, रावसाहेब वाळे, भाऊसाहेब वाळे, गेणू पवार, शांताराम पवार, अण्णासाहेब वाळके, संजय सावंत, रामदास वाळे आदी दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

Visits: 103 Today: 1 Total: 1100888

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *