संगमनेर-अकोल्याने साकारला वाकचौरेंचा विजय! एकूण मतांमध्ये 40 टक्के वाटा; उर्वरीत तालुक्यांमध्ये लोखंडे आघाडीवर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गायब व गद्दार खासदारापासून ते तुपचोरीच्या आरोपांपर्यंत घसरलेल्या प्रचाराच्या पातळीतही शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तब्बल 50 हजार 529 मतांनी धूळ चारली. एरव्ही लोकसभा निवडणुकीत उजव्या विचारसरणीला साथ देणार्‍या संगमनेरसह डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या अकोले तालुक्याने उद्धव ठाकरेंच्या प्रति सहानुभूती दर्शवतांना मापदंडांना डावलून भरभरुन मतांचे दान टाकताना वाकचौरे यांना झालेल्या एकूण मतदानातील 40 टक्क्यांचा भार उचलला. त्याचा परिणाम उर्वरीत चार मतदार संघांनी सदाशिव लोखंडेंच्या बाजूने मतदान करुनही शिर्डीत शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवाराचा दणदणीत विजय झाला. या दोन्ही तालुक्यांनी मिळून त्यांना दिलेली 84 हजार 952 मतांची आघाडी विरोधी उमेदवाराला शेवटपर्यंत कापता आली नाही.


अतिशय नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या शिर्डी लोकसभेची निवडणूक अगदी सुरुवातीपासूनच राज्याच्या चर्चेत होती. 2009 साली संयुक्त शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार्‍या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा पराभव करुन हा मतदार संघ शिवसेनेच्या पदरात टाकला. मात्र 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आघाडीकडून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. त्यावेळी ऐनवेळी सदाशिव लोखंडे यांना आयात करुन शिवसेनेने त्यांचा पराभव करीत त्यांना पश्‍चातापाच्या दरीत लोटले.


त्यानंतर झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये लोखंडे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. यावेळी मात्र राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याने संयुक्त शिवसेना दुभंगली आणि त्याचे ठाकरे व शिंदे असे दोन गट निर्माण झाले. त्यातच लोखंडे यांनीही वाकचौरेंच्या पावलावर पाऊल ठेवताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, तर वाकचौरेंनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेत ठाकरे गटाची उमेदवारी पदरात पाडली. मूळ पक्षाशी बंडखोरी केलेल्या या दोन्ही उमेदवारांमध्ये होणारी निवडणूक म्हणून शिर्डीकडे राज्याचे लक्ष खिळले होते.


प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे घघाघाती आरोपही केले. त्यात साईबाबा संस्थांनमधील तुप घोटाळ्यासह लोखंडेंच्या अनुदान लाटण्याच्या चर्चेलाही हवा दिली गेली. यासर्व पार्श्‍वभूमीवर शिर्डीचा निकाल अनिश्‍चित वाटत असताना संगमनेर-अकोल्याने मात्र राज्यातील फोडाफोडीचे राजकारण नाकारले आणि सुप्तपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने मतदान केले. अर्थात महाविकास आघाडीत सामील असलेले संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांच्या यंत्रणेने घेतलेले परिश्रम आणि आजवर भाजपच्या विरोधात असलेल्या अकोल्यातील जनतेने नाकारलेला पिचड-लहामटेंचा दबाव महत्त्वाचा ठरला.


यासर्वांचा परिपाक संगमनेर तालुक्याने वाकचौरे यांच्या झोळीत 97 हजार 561 मतांचे दान टाकताना त्यांना तब्बल 30 हजार 573 मतांची आघाडी मिळवून दिली. तर, अकोले तालुक्यातील मतदारांनी 93 हजार 25 मतांचे दान टाकताना तब्बल 54 हजार 379 मतांची विजयी आघाडी त्यांच्या झोळीत टाकली. या दोन्ही तालुक्यांनी मिळून वाकचौरे यांना मिळालेल्या एकूण 4 लाख 76 हजार 900 मतांमधील थोडे न् थिडके 1 लाख 90 हजार 586 (40 टक्के) इतकी मतं दिली. त्यातून मिळालेली 84 हजार 952 मतांची आघाडी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शेवटच्या फेरीपर्यंत कापू शकले नाहीत आणि त्यांचा 50 हजार 529 मतांनी पराभव झाला.


या निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदार संघातील सहा तालुक्यांमधून प्रमुख तिनही उमेदवारांना मिळालेली मतं पुढीलप्रमाणे – अकोले (वाकचौरे) 93025, (लोखंडे) 38646, (रुपवते) 8840, संगमनेर – (वाकचौरे) 97561, (लोखंडेे) 66988, (रुपवते) 10923, शिर्डी – (वाकचौरे) 68623, (लोखंडे) 81994, (रुपवते) 18891, कोपरगांव – (वाकचौरे) 63023, (लोखंडे) 74752, (रुपवते) 17760, श्रीरामपूर – (वाकचौरे) 74960, (लोखंडे) 86545, (रुपवते) 22028 व नेवासा (वाकचौरेे) 73445, (लोखंडे) 76573 व (रुपवते) 12306 या प्रमाणे मतदान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *