शिर्डीत युवकाच्या मेंदूमधील रुतलेला दगड शस्त्रक्रियेद्वारे बाहेर न्यूरोसर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांच्यासह न्यूरो पथकाला आले यश
नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांच्या पथकाने गेल्या पाच महिन्यांपासून एका युवकाच्या मेंदूमध्ये रुतलेला दगड काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सर्व न्यूरो सर्जरी टीमचे अभिनंदन केले.
साई संस्थान संचलित रुग्णालयात राज्याच्या कानाकोपर्यातून तसेच राज्याबाहेरील हजारो रुग्ण विविध उपचारांसाठी दाखल होत असतात. या रुग्णालयामध्ये मेंदू शल्य विभागात दर महिन्याला साधारणत: सरासरी 60 ते 70 मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया होतात. परभणीचे रुग्ण सचिन मारके (वय 37) हे गेल्या पाच महिन्यांपासून डोक्याला झालेली जखम घेऊन श्री साईबाबा हॉस्पिटल येथे तपासणीसाठी न्यूरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांच्याकडे आले.
साधारणत: पाच महिन्यांपूर्वी (ऑगस्ट 2022) दुचाकीवरून पडण्याचे त्यांना निमित्त झाले अन् डोक्याला एक छोटी जखम झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी जखम नंतर मात्र वाढत गेली. ती जखम बरी होण्याचं काही नाव घेत नव्हती. औषधे, मलमपट्टी झाली, मग सीटीस्कॅनही झालं. पण निदान काही होईना. जखमेतून पाणी येणे बंद होत नसल्यामुळे डिसेंबरमध्ये परत सीटीस्कॅन करून औषधं सुरु केली होती. तरीही व्हायचा तो त्रास सुरुच होता. शेवटी श्री साईबाबा हॉस्पिटल आणि डॉ. मुकुंद चौधरी यांचे नाव ऐकून परभणीचा रुग्ण पाच महिन्यांनंतर उपचारासाठी शिर्डीमध्ये आला. रुग्णाची सर्व हकीगत समजावून घेत डॉ. मुकुंद चौधरी यांनी पुन्हा सीटीस्कॅनचा सल्ला दिला. सीटीस्कॅन पाहून डॉक्टरही बुचकळ्यात पडले. कवटीचे हाड तोडून मेंदूमध्ये गाठ झाली, असं प्रथमदर्शनी वाटत असले तरी पाच महिने उपचार घेऊनही ही गाठ का झाली? हा प्रश्न सुटत नव्हता.
डॉ. चौधरी यांना ती हाडाची गाठ नसून काहीतरी इतर पदार्थ असल्याची शंका आली. रेडिओलॉजिस्ट डॉ. श्रीकांत नागरे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनीही इतर पदार्थ असल्याची शक्यता व्यक्त केली. योग्य निदान होत नसल्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. 17 जानेवारी 2023 रोजी न्यूरो सर्जन डॉ. चौधरी व वरिष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे आणि न्यूरो टीम यांनी जरा उत्सुकतेनेच ह्या शस्त्रक्रियेला सुरुवात केली. पण सर्जरी करताना जी गोष्ट दिसली त्याने डॉक्टरही चक्रावून गेले. कवटीचे हाड तोडून एक मोठा दगड मेंदुमध्ये खोलवर जाऊन बसला होता. आजुबाजूच्या भागाची सर्जरी करून इतर भागाला धक्का न लागू देता मेंदूमधील दगड अलगद काढण्यात डॉ. चौधरी यांना यश आले. शस्त्रक्रियेला आता 10 ते 12 दिवस झाले असून रुग्णाला कुठलाही त्रास झाला नाही. तसेच झालेल्या जखमेतून पाणी येणंही बंद झाले. पाच महिन्यांपासून मेंदूमध्ये दगड असतानाही रुग्ण वाचणं, त्याचं निदान होणं आणि शस्त्रक्रियेनंतरही सुखरूप राहणं ही वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ केस असल्याचं डॉ. मुकुंद चौधरी म्हणाले. अशाप्रकारे दुर्मिळ आणि अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थानचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक व उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी सर्व न्यूरो सर्जरी टीमचे अभिनंदन केले.