श्रीरामपूरात मंगळवारी जोरदार पाऊस बरसल्याने उकाड्यापासून दिलासा एक तास पाऊस बरसल्याने गटारी भरल्या तुडूंब तर शेतातून वाहिले पाणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यात मंगळवारी (ता.1) सायंकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह बिगर मोसमी पावसास जोरदार सुरुवात झाली. विशेषतः वादळी वारा नसल्यामुळे सुमारे एक तास जोरदार पाऊस बरसल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.


शहरात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने गटारी तुडूंब भरून वाहू लागल्या. रस्त्यांवर पावसाचे पाणीच पाणी दिसत होते. शहरातील तीनही रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पुलाखालील पाणी कमी होईपर्यंत अनेकांना पावसातच उभे रहावे लागले. शहराबरोबरच तालुक्यातील बेलापूरलाही जोरदार पावसाने झोडपले. याचबरोबर भेर्डापूर, मातापूर, उक्कलगाव या प्रवरा पट्ट्यातही जोरदार पाऊस झाला. तसेच वडाळा महादेव, निपाणी वडगाव, हरेगाव फाटा, भैरवनाथनगर येथे पावसाने धुवाधार बॅटिंग केली. तर भोकर, खोकर, टाकळीभान, दिघी, निमगाव खैरी, गोंडेगावसह गोदावरी पट्ट्यात मात्र केवळ आाभाळ तर काही ठिकाणी बुरबुर झाली.

सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सुमारे पाऊण ते एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतातून पावसाचे पाणी वाहू लागले होते. तर अनेक ठिकाणी खड्डे तुडूंब भरलेले दिसत होते. वार्‍यामुळे कुठेही झाडेझुडूपे पडलेली आढळून आली नाही. मात्र, उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला.

Visits: 243 Today: 1 Total: 2124876

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *