शिर्डीत उमटणार अहमदनगर दक्षिणच्या निकालाचे प्रतिबिंब! विखे-थोरातांचे एकमेकांना आव्हान; जिल्ह्यातील राजकीय तणाव वाढला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्याच्या दोन्ही मतदार संघातील निकालांचे धक्के अद्यापही जाणवत असून दोघा दिग्गज नेत्यांनी एकमेकांना आव्हान दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय तणावातही मोठी वाढ झाली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निकालापूर्वी दक्षिणेत प्रचंड मताधिक्क्याने विजयाचा दावा करीत थेट माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शेलकी भाषेत टीका केली होती. मात्र प्रत्यक्ष निकालात दक्षिणेसह उत्तरेची जागाही गेल्याने मंत्री विखे यांच्या मंत्रीपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना संगमनेरात विजयाचा जल्लोश करताना माजीमंत्री थोरात यांनी ‘दहशतीचे झाकण उडवणार’ या भाषेत विखेंच्या ‘त्या’ आव्हानाला प्रतिआव्हान दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. पुत्राचा पराभव जिव्हारी लागलेल्या विखेंनी निकालानंतर पुन्हा ‘त्या’ तिघांना अस्तित्वाचा इशारा दिल्याने आगामी कालावधीतील जिल्ह्यातील सर्व निवडणुकांमध्ये थोरात-विखे यांचा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपकडून केल्या गेलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानंतरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले राजकीय वजन वापरुन दक्षिणेत आपल्या सुपूत्रासाठी तिकिटं मिळवलं. तर, उत्तरेतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनेच्या आधारावर सदाशिव लोखंडे यांच्या नावाचा आग्रह धरल्याने या दोन्ही मतदार संघात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निकालापूर्वी माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दक्षिणेत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळणार असल्याचा दावाही केला होता. त्याचवेळी त्यांनी नीलेश लंकेंच्या प्रचारासाठी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावणार्या माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही शेलकी भाषेत खरमरीत टीका केली होती.
चार जूनरोजी प्रत्यक्ष निकालात मात्र महायुतीने नगर दक्षिणसह शिर्डीची जागाही गमावल्याने या दोन्ही मतदार संघांची जबाबदारी असलेल्या मंत्री विखेंना मोठा धक्का बसला. जिल्ह्यात महायुतीचा पराभव झाल्याच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना त्यांनी डॉ.सुजय विखे यांच्या पराभवासाठी दक्षिणेत संपूर्ण यंत्रणा राबवणार्या थोरात यांच्यासह कोपरगावचे आमदारपूत्र विवेक कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करीत आता त्यांना आपल्या ‘अस्तित्वासाठी’ संघर्ष करावा लागेल असा गर्भित इशारा दिला होता. त्यांच्या वक्तव्यातून दक्षिणेचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचेही स्पष्टपणे दिसून आले होते. मात्र दोनवेळा त्यांनी जोरदार टीका करुनही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने ते काय बोलतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
मंगळवारी निकालांची घोषणा झाल्यानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरातील यशोधन कार्यालयात जल्लोश साजरा केला. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरातही हजर होते. त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधीत करताना थोरातांनी विखे पाटलांच्या ‘त्या’ इशार्याचा त्यांच्याच भाषेत खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी ‘शिर्डीतील दहशतीचे झाकणही लवकरच उडवणार’ असा जोरदार प्रतिहल्लाही चढवला. त्यावरुन शिर्डी विधानसभा मतदार संघातही ‘दक्षिणे’प्रमाणेच काम करण्याचे संकेत मिळाल्याने आगामी निवडणुकांमध्ये थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकावर पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वेक्षणात कमकुवत ठरलेल्या डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी मंत्री विखे पाटील यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्यासोबतची कटुता विसरुन त्यांना सोबत घेतले. या दोघांनी अन्य नेत्यांच्या सोबतीने दक्षिणेतील मतदार संघ पिंजून काढला. मात्र मतदारांनी त्यांना थाराच दिला नसल्याचे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आले. त्याची मीमांसा करताना कर्जत-जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांनी राबवलेली यंत्रणा, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोपरगावचे आमदारपूत्र विवेक कोल्हे यांना सोबत घेत संपूर्ण दक्षिण मतदार संघात केलेले नियोजन आणि मतदारांच्या भेटीगाठी याचा परिणाम नीलेश लंके यांच्या विजयात झाला. निकालापूर्वीच तशी चिन्ह दिसू लागल्यानंतर माध्यमांनी मंत्री विखंेंना दक्षिणेबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी प्रचंड मताधिक्क्याचा दावा करीत थेट थोरात यांना लक्ष्य केले.
मात्र संयमी राजकारणी अशी ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी घार्ईगडबडीत प्रत्युत्तराऐवजी निकालांची प्रतिक्षा केली. चार जूनरोजी दोन्ही मतदार संघात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर जल्लोश साजरा करताना त्यांनी विखेंच्या दोन्ही आव्हानांना त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्त्युत्तर देताना शिर्डीतील दहशतीचे झाकणही लवकरच उडवू असा घणाघात करीत प्रतिआव्हान दिले. त्यातून जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील संघर्ष टोकाला जाणार असल्याचे संकेत मिळत असून जिल्ह्यातील राजकीय तणावात प्रचंड वाढ झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील आजी-माजी महसूलमंत्र्यांमधील राजकीय संघर्ष अवघ्या राज्याला परिचयाचा आहे. राहाता वगळता विखे पाटलांकडून जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या राजकारणात होणारी ढवळाढवळ त्या-त्या ठिकाणच्या प्रस्थापितांना कधीही पचनी पडली नाही. त्याचे प्रतिबिंब यापूर्वीही जिल्ह्यात दिसून आले आहेत. यावेळी मात्र विखे पाटलांनी थेट नावांचा उल्लेख करीत थोरात, कोल्हे व लंकेंवर शरसंधान साधल्याने आगामी कालावधीत जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार हे मात्र निश्चित मानले जात आहे.