धक्कादायक; विम्याचे पैसे लाटण्यासाठी दिला मनोरुग्णाचा बळी अकोले तालुक्यातील घटना; सहा जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नायक वृत्तसेवा, राजूर
विम्याचे पैसे लाटण्यासाठी विविध बनाव रचल्याच्या घटना अनेकदा घडतात. मात्र, अकोले तालुक्यातील अमेरिकेत कूक म्हणून काम करणार्‍या एकाने भायनक कृत्य केले. अमेरिकेन विमा कंपनीकडून सुमारे 38 कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी त्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला खरा पण त्यासाठी एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला. हा बळीही अतिशय क्रूरपणे घेतला. एक कोब्रा नाग आणून त्याला त्या व्यक्तीच्या अंगावर सोडले. नाग चावल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तो व्यक्ती आपणच असल्याचे भासविण्यासाठी त्याची कागदपत्रे आपल्याच नावाने बनविली. त्याकाळात देशात कोरोनाचा कहर सुरू होता. त्यामुळे भारतात हा प्रकार खपून गेला. मात्र, अमेरिकेत जेव्हा हे प्रकरण पडताळणीसाठी आले, तेव्हा बनाव उघड झाला. आता मुख्य आरोपीसह सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या गेल्या आहेत.

राजूर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रभाकर भिमाजी वाघचौरे (वय 50, मूळ रा. धामणगाव पाट, ता. अकोले) याच्यासह त्याला मदत करणारे संदीप तळेकर, हर्षद रघुनाथ लहामगे, हरीष रामनाथ कुलाळ व प्रशांत रामहरी चौधरी यांना अटक केली आहे. त्यांना मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रभाकर भिमाजी वाघचौरे हा 1994 पासून कुटुंबासह अमेरिकेत राहत होता. आधी तो तेथे कूक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने स्वत:चे छोटे हॉटेल सुरू केले. 2017 मध्ये त्याने तेथील ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनी या अमेरिकेतील मोठ्या कंपनीकडून त्याचा आणि पत्नीचा 15 लाख अमेरिकन डॉलर्सचा विमा उतरविला होता. विमा उतरविल्यानंतर काही काळात त्याने गावाकडील ग्रामपंचायतीकडून पत्नीचा मृत्यू झाल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळविले. ते दाखल करून पत्नीच्या विम्याची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीने केलेल्या पडताळणीत तो दावा फेटाळला गेला होता. त्यावेळी ते दोघेही अमेरिकेत होते. पहिला प्रयत्न फसला तरीही त्याने दुसरी योजना आखली. जानेवारी 2021 मध्ये वाघचौरे भारतात परत आला. धामणगाव पाट या सासुरवाडीच्या गावात तो राहत होता. त्याने स्वत:चा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्याची योजना आखली. दुसर्‍या व्यक्तीला मारायचे आणि तो आपणच असल्याचे भासवायचे अशी ही योजना होती. त्यासाठी व्यक्तीची शोधाशोध सुरू केली.

काही दिवसांनी त्याला शेजारच्या गावात एक वेडसर व्यक्ती आढळून आली. त्याचे कोणीही नातेवाईक तेथे नसल्याचे हेरून त्या व्यक्तीला पकडून आणले गेले व एका खोलीत ठेवले. त्यानंतर त्याला साप चावून मृत्यू झाल्याचे दाखवायचे ठरविण्यात आले. यासाठी त्याने पाच साथीदारांची मदत घेतली. एका सर्पमित्राकडून कोब्रा जातीचा नाग आणण्यात आला. रात्री त्या व्यक्तीला साप असलेल्या बरणीत हात घालण्यास सांगण्यात आले. मात्र, ती व्यक्ती हात घालत नव्हती. त्यामुळे मग त्या व्यक्तीला वाहनातून जवळच्या जंगलात नेण्यात आले. तेथे नागाला बरणीतून बाहेर काढून त्याच्या पायावर टाकण्यात आले आणि नागाने त्या व्यक्तीचा चावा घेतल्याने काही वेळातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारी रुग्णवाहिका बोलावून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. सर्व कागदपत्रांवर त्या व्यक्तीचे नाव प्रभाकर भिमाजी वाघचौरे असे नोंदविण्यात आले तर स्वत: प्रवीण वाघचौरे नावाने वावरत होता.

कोरोनाचा काळ असल्याने अंत्यविधीही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर त्याने मुलांच्या मार्फत विमा कंपनीकडे दावा केला. मात्र, एकदा फसवणुकीचा प्रयत्न झाल्याने विमा कंपनीने एका भारतीय कंपनीच्या मदतीने हे प्रकरण पडताळणासाठी पाठविले. त्यासाठी पोलिसांची मदत घेतली. तेव्हा सखोल चौकशीत हा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी या गुन्ह्यातील पंच साक्षीदारांपासून चौकशीला सुरुवात केली. मात्र, वाघचौरे याने चलाखीने सर्व पंच आपले साथीदाराच राहतील, असे पाहिले होते. असे असले तरी पोलिसांच्या चौकशीत त्याचा बनाव उघडकीस आला. त्यामुळे सर्वांच्या हातात बेड्या पडल्या. दरम्यान, मयत व्यक्ती नवनाथ यंशवत आनप (वय 50, रा. धामणगाव आवारी) असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी राजूर पोलिसांत वरील सहा आरोपींविरोधात गुरनं. 183/2021 भादंवि कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई संगमनेर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक किरण साळुंके, पोहेकॉ. नेहे, पोलीस नाईक भडकवाड, डगळे, वाडेकर, पटेकर, पोकॉ. अशोक गाढे, थोरात, विजय फटांगरे, अशोक काळे, मोरे, प्रमोद जाधव, फुरकान शेख यांनी केली आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 115638

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *