शेवगावच्या नगर अर्बन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा संशयास्पद मृत्यू भातकुडगाव येथील शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळले; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
नायक वृत्तसेवा, शेवगाव
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. ही बँक विविध आर्थिक गैरप्रकारांमुळे सध्या चर्चेत आहे. शेवगाव शाखेतील सोने तारण गैरव्यवहारही अलीकडेच उघडकीस आला होता. त्याच्या तणावातून शिंदे यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा बँकेच्या वर्तुळात आहे. आधीच राजकारण पेटलेल्या या सहकारी बँकेत आता राजकारणासाठीही हा नवा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
गोरक्षनाथ शिंदे यांच्या आकस्मिक मृत्यूने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता.27) दुपारी ही घटना उघडकीस आली. शिंदे हे तालुक्यातील भातकुडगाव येथे राहतात. दुपारी त्यांच्या शेतात ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झालाचे सांगण्यात आले. शिंदे यांचे चुलत भाऊ कचरू शिंदे यांनी पोलिसांत खबर दिली. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. शिंदे यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलिसांकडून अद्याप यासंबंधीचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
नगर अर्बन बँक गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. गैरप्रकार आणि त्यासंबंधीच्या तक्रारी वाढल्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचा गैरव्यवहार अलीकडेच उघडकीस आला आहे. वास्तविक पहाता यासंबंधी काही वर्षांपासूनच तक्रारी सुरू होत्या. शिंदे यांनी 2018 मध्येच यासंबंधी बँकेच्या मुख्यालयाकडे पत्रव्यवहार केला मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तारण सोन्याचा अलीकडेच लिलाव ठेवण्यात आला होता. त्यावेळी ते बनावट असल्याचे आढळून आले. बँकेने यासंबंधी पोलिसांत तक्रार दिली आहे. या लिलावाच्यावेळीही प्रशासक आणि काही सभासदांमध्ये वाद झाले होते. प्रदीर्घ काळापासून बँकेत सुरू असलेल्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सभासदांचा असून त्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा सुरू आहे. आता शिंदे यांच्या आत्महत्येमुळे याला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.