बाळासाहेब थोरातांच्या परिश्रमाने काँग्रेसला नवसंजीवनी! दशकाचा दुष्काळ संपला; ‘शाश्‍वत विचारांना’ मिळाले जनसमर्थन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
18 व्या लोकसभेसाठी झालेली यंदाची निवडणूक अनेक कारणांनी दीर्घकाळ चर्चेत राहील. गेल्या दोनवेळच्या निवडणुकांमधील घवघवीत विजयाच्या उन्मादातून यावेळी भाजपने चारशेंचा टप्पा ओलांडण्याची घोषणा केली. त्यासाठी आवश्यक असलेले जमिनीवरील त्यांचे नियोजन मात्र पूर्णतः फसल्याचे चित्र निकालानेे दाखवले. गेल्या दीड-दोन वर्षात राज्यातील दोन मोठ्या राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडी घडवून बंडखोरांचा ‘राज्याभिषेक’ करुन त्यांनाच खरे भासवण्याचा प्रयत्न झाला. यंत्रणांचा हत्यारासारखा वापर करुन विरोधकांच्या मनात धाक निर्माण केला गेला. मात्र या सर्वांना झुगारुन राज्यातील महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपला धोबीपछाड दिला. त्यातही सद्यस्थितीत एकही खासदार नसलेल्या काँग्रेसने राज्यात केलेली दिमाखदार कामगिरी भल्याभल्यांना हादरवणारी ठरली. तिनही पक्षांशी समन्वय, प्रचाराचे आणि त्यातील मुद्द्यांचे योग्य नियोजन आणि एकत्रित परिश्रमाच्या जोरावर काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने राज्यात मोठा विजय संपादीत केला. या विजयाचे अनेक कंगोरे आहेत, त्यातील एक म्हणजे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या परिश्रमांनी त्यांच्या पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. पक्षाचे कार्यकर्ते पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यातही त्यांना यश आल्याने राज्यातील आगामी निवडणूका भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना सोप्या नसतील हे निश्‍चित.


मागील दोन्ही निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या चेहर्‍यावर राज्यासह देशभर भाजपने मोठे यश मिळवले. या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल असे मनोमन मानून त्यासाठी भाजपने विविध राज्यांमध्ये 50 टक्के मतांची बेगमी करण्याचा डाव आखला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मूळ शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली. त्यामुळे निर्माण झालेली जवळपास 23 टक्क्यांची पोकळी भरुन काढण्यासाठी भाजपने आधी एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडली. मात्र त्यानंतरही निश्‍चित ध्येय साध्य होत नसल्याने खुद्द पंतप्रधानांनी वारंवार सिंचन घोटाळ्याचा आरोप केलेल्या अजित पवारांना हाताशी धरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शकलं उडवली गेली. या दोघांना मिळणार्‍या मतांमधून भाजपचे चारशेच्या पल्याड जाण्याचे स्वप्नं पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आले. मात्र निवडणूक निकालांनी ते साफ धुडकावले गेल्याचे आता स्पष्ट झाले असून महायुतीला राज्यात केवळ 42.73 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले आहे.


त्या उलट पक्षफोडीने उद्धव ठाकरे व त्यानंतर शरद पवार यांच्याबद्दल राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण झाली, त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना मिळेल असे गृहीत धरले जात असताना त्यांच्यासह आघाडीत असलेल्या काँग्रेसचे काय? असा प्रश्‍नही निर्माण झाला. राज्यातील काँग्रेसची मानसिकता आणखी खराब करण्यासाठी भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठनेते अशोक चव्हाणांना गळाला लावले गेले. त्यातून राज्यातील काँग्रेस पक्ष खिळखिळा होईल असाच भाजपचा मनसुबा होता. मात्र काँग्रेसच्या विधीमंडळाचे नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तो उधळून लावतांनाच पक्षाच्या उमेदवारांसह महाविकास आघाडीच्या प्रचाराची सूत्रं आपल्या हाती घेत समन्वयाने आपला धडाका सुरु केला. मागील निवडणुकांच्या पराभवाने कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली पराभवाची मानसिकताही त्यांनी संपुष्टात आणली व त्यांच्या मनात विजयाचा जोश भरला. गेल्या दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत त्यांनी राज्याच्या विविध मतदार संघात 43 जाहीर सभांसह 13 ठिकाणी रोड शो करुन केवळ काँग्रेसच्याच नव्हेतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या उमेदवारांसाठीही प्रचंड मेहनत घेतली.


या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत लढणार्‍या काँग्रेसने राज्यात 17 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील 76 टक्के (13 जागा) जागांवर त्यांना यश मिळाले. गेल्या अडीच महिन्यांत स्वपक्ष आणि आघाडीच्या उमेदवारांसाठी थोरात यांनी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, अमरावती, नांदेड, हिंगोली, नाशिक, धुळे, जळगांव, नंदूरबार, अहमदनगर, शिर्डी, पुणे, मावळ, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा आणि रोडशोंचा अक्षरशः धडाका लावला. या सभांमधून त्यांनी केंद्र सरकारची हुकुमशाही, यंत्रणांचा हत्यारासारखा वापर करुन विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र, प्रचंड बहुमताच्या जोरावर संविधानावर आघात अशा राष्ट्रीय मुद्द्यांसह बेरोजगारी, महागाई, शेती उत्पादनांची अवस्था, कांद्याचे भाव अशा जमिनीवरच्या विषयांकडे राज्यातील जनतेचे लक्ष वेधले. यासर्वांवर उपाय म्हणून त्यांनी काँग्रेसची शाश्‍वत विचारधाराच कशी योग्य आहे हे पटवून देण्यातही यश मिळवले.


राज्यात पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून आपले दायित्त्व पूर्ण करतांना त्यांनी स्वतःच्या जिल्ह्याकडे किंचितही दुर्लक्ष होवू दिले नाही. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार सहकारी पक्षांचे असतानाही त्यांनी दोघांच्याही विजयाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. स्थानिक पातळीवर आपल्या कार्यकर्त्यांना जबाबदार्‍या वाटून वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावाही घेतला. जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार सामान्य असल्याने त्यांच्याकडे निवडणूक यंत्रणांचा अभाव असल्याचे ताडून त्यांनी आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात अगदी तळागाळापर्यंत जावून मतदारांना आपला विचार पटवला. या सगळ्यांचा परिपाक मागील दोन्ही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये अस्तित्त्वासाठी झगडणार्‍या काँग्रेसला केवळ नवसंजीवनीच मिळाली नाही तर, भाजपसारख्या बलाढ्य पक्षालाही पाठीमागे खेचतांना 18 व्या लोकसभेत राज्यातील 48 पैकी 13 जागा पटकावून काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला.

अर्थात यशाला अनेक दावेदार असतात काँग्रेसच्या विजयालाही अनेक दावेदार आहेत. मात्र बाळासाहेब थोरात यांचा गेल्या दशकभरातील राजकीय प्रवास विचारात घेता राज्यात डगमगलेल्या काँग्रेसच्या नौकेला स्थीर करण्यासाठी त्यांनी पडक्या काळात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेत पक्षातील पडझड रोखण्यासह पक्षाला राज्यातील सत्तेची फळेही चाखवली आणि आता शाश्‍वत विचारधारा घेवून त्यांनी शून्य खासदार असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधीक 13 जागांवर काँग्रेसला विजय मिळवून देत दशकभरानंतर पक्षाला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणून बसवण्यात मोठे योगदान दिले आहे.


लोकसभेच्या राज्यातील 48 जागांमधील 17 जागा लढवताना काँग्रेसने 76 टक्क्यांचा स्ट्राईक रेट साधताना तब्बल 13 जागांवर यश मिळवले आहे. विशेष म्हणजे 17 व्या लोकसभेच्या शेवटाला या पक्षाचा राज्यातून एकही खासदार नव्हता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीला सामोरे जाताना कार्यकर्त्यांची पराभूत मानसिकता दूर करण्याचे सर्वात मोठे आव्हान काँग्रेस समोर होते. अशा स्थितीतही काँग्रेसचे ज्येष्ठनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा जोश भरण्यासह आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यातील विविध मतदार संघांमध्ये तब्बल 43 जाहीर सभा आणि 13 रोड शो घेतले. त्याला राज्यातून मोठा प्रतिसादही मिळाला आणि तो मतांच्या रुपाने समोरही आला. या निवडणुकीतून आघाडीच्या परस्पर समन्वयासह विस्कळीत झालेला काँग्रेसअंतर्गत संवादही सुरळीत झाल्याचे दिसू लागल्याने आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुन्हा गतवैभवाची आशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *