श्रीरामपूर शहरासह गावांनीही कडकडीत बंद पाळला लाठीहल्ल्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी (ता.३) श्रीरामपूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत शहरातील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय शंभर टक्के दिवसभर बंद ठेवून पाठिंबा दिला. तसेच तालुक्यातील विविध गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.

या घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूर बंद ठेवण्यासाठी शहरातील सकल मराठा समाजाच्यावतीने आदल्या दिवशी शहरातून फेरी काढून सर्व व्यावसायिकांना बंद पाळण्याबाबत सांगितले होते. सकल मराठा समाजाच्या हाकेला प्रतिसाद देत शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय दिवसभर बंद ठेवले. सकाळी गांधी पुतळा येथे निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी शहरातील व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर निषेध सभेत जालना जिल्ह्यामधील अंतरवलीमध्ये शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षण आंदोलन सुरू होते. अचानक त्याठिकाणी दोन हजार पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केला. त्यातील आंदोलक महिलांना मारहाण करण्यात आली. मुलांना बंदुकीच्या छर्‍याने जखमी करण्यात आले. १२० पेक्षा जास्त आंदोलकांना रुग्णालयात जाईपर्यंत मारले. या पोलिसांना देणारा कोण होता. या हल्ल्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच जालना जिल्हा पोलीस प्रमुखांना निलंबित करण्यात यावे, अशा मागण्या यावेळी आंदोलकांच्यावतीने करण्यात आल्या.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी गांधी पुतळा येथे येऊन सकल मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले. जालना येथे झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री विखे यांनी दिले. तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष भागडे यांनी करोना काळात प्रवरा शिक्षण संस्थेत मराठा व ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ केली होती. याबद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले व मराठा आरक्षणप्रश्नी त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

Visits: 169 Today: 1 Total: 2069924

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *