लिंगदेवमध्ये पारंपरिक ‘संगीत आखाडी’ने यात्रौत्सव साजरा सोंगांच्या लिलावातून देवस्थानला मिळाले अकरा लाख रुपये
नायक वृत्तसेवा, अकोले
गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक ‘संगीत आखाडी’ने (बोहडा) लिंगेश्वर महादेव यात्रौत्सव लिंगदेव (ता.अकोले) येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. या आखाडीत फक्त ग्रामस्थच पौराणिक पात्रे घेतात व लिलावाद्वारे यात्रेत सोंगे नाचविण्याचा मान मिळवतात. यंदा सोंगांच्या लिलावातून देवस्थानला तब्बल 10 लाख 84 हजार 750 रुपये मिळाल्याची देवस्थानचे अध्यक्ष माजी प्राचार्य डी. बी. फापाळे यांनी दिली.
यावर्षी आखाडी यात्रा उद्घाटन लिलावाची बोली 80 हजार 500 रुपयांपर्यंत जावून ऋषीकेश पवार यांनी हा महाआरतीचा मान मिळवला. 70 हजार रुपये देणगी देवून राजा हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हाद हे पात्र अभियंता अमोल फापाळे यांनी नाचविले. तर 65 हजार रुपये लिलाव बोलीतून रमेश हाडवळे यांनी आखाडीचे उद्घाटन केले. दीपक होलगीर यांनी 61 हजार 500 रुपये बोलीतून इंद्रजीत, राधाकिसन फापाळे यांनी 46 हजार देवून सूत्रधार व साईनाथ पवार यांनी 55 हजार 500 रुपये देवून रावण ही पात्रे नाचविले.
लिंगेश्वर मंदिरात वर्षभर अखंड नंदादीप तेवत असतो याची सेवाही लिलाव बोलीतून गावकरी स्वीकारतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पहिले पात्र सूत्रधार नाचत येऊन आखाडी परंपरेची महती विषद करतो. भीमाची बायको हिडींब, मुलगा घटोत्कच आणि अर्जुनपुत्र अभिमन्यूच्या सोंगाने गुरुवारी (ता.23) सकाळी आखाडीची सांगता झाली. विष्णूपुराण, दशावतार, बाणी, शेंडीनक्षत्र, सत्यवान-सावित्री, भक्त प्रल्हाद-हिरण्यकश्यपू, राम-रावण, त्राटिका, इंद्रजीत युध्द, भीम-बकासूर आदी नाट्य प्रवेश सादर करुन पौराणिक कथा समाजापर्यंत पोहचविण्याचे काम लिंगदेवकर शेकडो वर्षांपासून करत आहेत. जवळपास 55 सोंगे आखाडीमध्ये नाचतात. तर देवस्थानचे विश्वस्त मंडळ व गावकरी यात्रेसाठी अहोरात्र झटतात. यात्रेच्या दुसर्या दिवशी कुस्त्यांचा हगामा होतो.
अनादि काळापासून चालत आलेल्या गुढीपाडव्याच्या संगीत आखाडी (बोहडा) परंपरेचे जतन अकोले तालुक्यातील लिंगदेव गावात पुरोगामी विचारांची सांगड घालून अभियंता, डॉक्टर अशा उच्चशिक्षित गावकर्यांकडून केले जात आहे. महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतपत गावात आखाडी लोककला जोपासली जाते. त्यात लिंगदेव अग्रभागी आहे.