आंदोलनाच्या भीतीने संगमनेरची बससेवा ठप्प! केवळ बाहेरुन येणार्‍या बसची वर्दळ; विद्यार्थी व प्रवाशी ताटकळले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शुक्रवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराट (ता.अंबड) येथील मराठा आंदोलकांना रुग्णालयात हलविण्यावरुन उडालेल्या धुमश्चक्रीचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. या घटनेत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने संतप्त जमावाने दगडफेक व जाळपोळ करीत राज्य परिवहन महामंडळाच्या चार बसेस पेटवून दिल्या तर काही ठिकाणी बसेसवर दगडफेकही झाली. त्याचा परिणाम राज्यातील अनेक ठिकाणच्या बस आगारांमधून आज सकाळपासून एकही बस बाहेर न पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. जिल्ह्यातील अतिशय वर्दळीचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणार्‍या संगमनेर बस आगारानेही सगळ्या फेर्‍या रद्द केल्याने सकाळपासूनच बसस्थानकात प्रवाशांसह विद्यार्थी ताटकळले आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेरातील मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखांची भेट घेतली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बस सोडण्याची विनंती करण्यात आली असून त्यांनाही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मराठा आरक्षणासह अन्य काही मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मनोज जरंगे यांच्या नेतृत्त्वाखाली जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या अंतरवाली सराट येथे आमरण उपोषण सुरु होते. यातील आंदोलकांची प्रकृती खालावत असल्याने शुक्रवारी (ता.१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरुन जरंगे यांच्याशी संपर्क करुन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि प्रशासनाने आंदोलकांना बळजोरीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. त्यातून वादाची ठिणगी पडून दगडफेक, लाठीचार्ज, अश्रृधूर आणि हवेत गोळीबार असा घटनाक्रम घडत गेला. संतप्त आंदोलकांनी प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध करीत अंबड – जालना मार्गावरुन धावणार्‍या चार बसेस थांबवून त्यातील प्रवाशांना उतरवून त्या पेटवून दिल्या.

हा प्रकार वार्‍याच्या वेगाने राज्यभर पसरल्यानंतर मराठवाड्यासह खान्देशात अनेक ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व काही ठिकाणी त्यांच्याकडून बसेसवर दगडफेक करण्याचेही प्रकार घडले. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागीय नियंत्रकांनी आज (ता.२) जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातून होणार्‍या सार्वजनिक बस वाहतूकीवर नियंत्रण आणले असून बहुतेक सर्वच बस आगारातून सुटणार्‍या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री ग्रामीण भागात मुक्कामी गेलेल्या बस आज सकाळी स्थानकात परतल्यानंतर एकही बस सोडण्यात आलेली नाही. सध्या केवळ बाहेरुन येणार्‍या लांब पल्ल्याच्या बसेसची तुरळक वर्दळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर बसस्थानक जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण समजले जाते. दिवसभरात संगमनेर बस स्थानकातून साडेतीनशेहून अधिक बसेसची ये-जा होते. याशिवाय संगमनेर बसआगाराच्या ६१ बसेसद्वाराही लांब व कमी पल्ल्याची प्रवाशी वाहतूक सुरु असते. तालुक्याच्या ग्रामीण भागातूनही दररोज हजारों विद्यार्थी शिक्षणासाठी संगमनेरात येतात, त्यांना माघारी घरी जाण्यासाठी केवळ ‘बस’ हाच एकमेव पर्याय असल्याने आज सकाळपासून विविध ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या स्थानिक आणि बाहेर गावच्या प्रवाशांसह शेकडो विद्यार्थीही संगमनेर बसस्थानकात अडकून पडल्याचे चित्र दिसत होते.

यावेळी आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज सकाळी ग्रामीण भागात दोन फेर्‍या मारल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन संगमनेर बसआगारातून सुटणार्‍या सर्व फेर्‍या रद्द करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांशी चर्चा करुन दुपारनंतर विद्यार्थ्यांसाठी काही बसफेर्‍या मारण्याचे नियोजन करण्याची तयारी त्यांनी दाखवली. शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनीही त्यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना केली. मात्र वरिष्ठांचा आदेश असल्याने त्यावर तत्काळ निर्णय घेण्यास असमर्थता असल्याने त्यांच्याशी संपर्क करुन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने संगमनेर बसस्थानकात अडकून पडलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना अनेक तास ताटकळत बसावे लागले.


आंदोलकांची शिष्टाई दिशादर्शक..
अंबड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील मराठा क्रांती मोर्चानेही बसस्थानक चौकात रस्ता रोको केला. त्यानंतर काही प्रमुख कार्यकर्त्यांनी संगमनेर बस आगारप्रमुख प्रशांत गुंड यांची भेट घेवून ग्रामीण भागातून संगमनेरात आलेल्या नागरिक व विद्यार्थ्यांसाठी काही बस सोडण्याची विनंती केली. आवश्यकता भासल्यास त्यासाठी प्रत्येक बसमध्ये क्रांती मोर्चाचे दोन कार्यकर्ते सोबत देण्याचीही तयारी दाखवण्यात आली. लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय घेवून विद्यार्थ्यांची सोय करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात एकीकडे बसेसवर हल्ले करुन त्यांची जाळपोळ व मोडतोड होत असताना संगमनेरच्या मराठा क्रांती मोर्चाने घेतलेली ही भूमिका राज्याच्या आंदोलनाला दिशादर्शक ठरावी अशीच आहे.

Visits: 20 Today: 2 Total: 84497

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *