महात्मा गांधींच्या विचारांची आज देशाला गरज : थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
जुलमी ब्रिटिशांविरुद्ध भारतातील सर्व जातीधर्मातील गोरगरीब नागरिकांना एकत्र करून  महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज जगामध्ये व भारतामध्ये अस्वस्थता आहे.त्यांच्या विचारांची जगाला गरज असून महात्मा गांधींचे विचार घेऊन देशातील लोकशाही वाचवण्यासाठी मोठी लोकचळवळ उभी करावी लागेल असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी केले.
जयहिंद लोकचळवळीच्या वतीने  महात्मा गांधी यांच्या १५६ वी जयंती, लालबहादूर शास्त्री यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरी प्रसंगी आयोजित कार्यक्रमात थोरात बोलत होते.  व्यासपीठावर  माजी आ. डॉ सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, उत्कर्षा रुपवते, डॉ. नामदेव गुंजाळ, डॉ. मैथिली तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज देशाला व जगाला  महात्मा गांधींच्या विचारांची गरज आहे. देशातील गोरगरीब, श्रीमंत, सर्व जाती-धर्मातील लोक एकत्र आले आणि गांधीजींच्या नेतृत्वात स्वतंत्र्यलढा दिला. देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांचा विचार जगमान्य आहे. नेल्सन मंडेला यांनी गांधी विचारातून दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रांती घडवली तर गांधी विचारातूनच अमेरिकेमध्ये महिलांना व निग्रो यांना मतदानाचा अधिकार मिळाला.
आज देशांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. जाती धर्माच्या नावावर भांडण लावुन राजकारणाची पोळी भाजली जात आहे. देशातील लोकशाही आणि राज्यघटना संकटात आली आहे. त्यामुळे  महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन देशातील लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी मोठी लोक चळवळ उभी करावी लागेल असे ते म्हणाले. यावेळी विजयादशमीच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
माजी आ. डॉ. तांबे म्हणाले,  महात्मा गांधी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील जगाने स्वीकारलेले व्यक्तिमत्त्व आहे. महात्मा गांधी शांतीचे पुरस्कर्ते होते. सत्य आणि अहिंसा हे त्यांचे तत्त्व होते. आज जगामध्ये सर्वाधिक त्यांच्यावर पुस्तके लिहिली गेली आहेत. १ लाख ५० हजार पुस्तके त्यांच्यावर असून ७० देशांमध्ये त्यांचे पुतळे आहेत. तर १०५ देशांमध्ये त्यांच्यावर तिकिटे काढली आहेत. पारतंत्र्याच्या विरोधात गांधीजींच्या नेतृत्वात मोठा लढा दिला गेला, स्वातंत्र्य मिळाले. आज मात्र त्यांच्या विचारांना छेद दिला जातो आहे. काही लोक गांधीजींचा द्वेष करतात. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर गांधीजींमुळेच भारताला सन्मान आहे. अहिंसा आणि नैतिकता ही त्यांच्या जीवनाचे तत्व असून त्यांनी आत्मशुद्धीला महत्त्व दिले आहे. युवकांनी गांधीजींचे विचार घेऊन पुढे जावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी साई अकॅडमीचे भगवान अहिरे, प्रा. बाबा खरात, वसंत बंदावणे, सुरेश झावरे, प्रा. प्रकाश पारखे, सुहास आहेर, एस. एम. खेमनर, चांगदेव खेमनर, डॉ.नितीन भांड, अनंत शिंदे,नामदेव कहांडळ, मिलिंद औटी,  विनोद महाराज राऊत, अविनाश कदम, जयहिंद लोक चळवळीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पारखे व नामदेव कहांडळ यांनी केले तर जयहिंदचे सचिव डॉ. नामदेव गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध विद्यालयांमधील २०० विद्यार्थ्यांनी  महात्मा गांधी यांची वेशभूषा केली. तर ७०० विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. यशोधन कार्यालय ते संगमनेर बसस्थानक झालेल्या प्रभात फेरीमध्ये  महात्मा गांधी यांच्या घोषणांबरोबर गांधीजींच्या भजनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर संगमनेर बसस्थानकावर सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन  महात्मा गांधी की जय, वैष्णव जनतो तेरे नाम, रघुपति राघव राजाराम या  महात्मा गांधींच्या भजनांनी संगमनेर शहर दुमदुमून दिले.
Visits: 164 Today: 1 Total: 1880894

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *