घोरपडा देवी देवस्थानमध्ये गैरकारभार? चौकशीसाठी विश्वस्तांनी दिला उपोषणाचा इशारा


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणार्‍या रंधा धबधबा येथील घोरपडा देवी देवस्थानमधील गैरकारभाराची चौकशी करा. तसेच गैरव्यवहार करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी विश्वस्त मंगळा भदू पटेकर आणि लहू रामा ढगे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

घोरपडा देवी देवस्थानचे विश्वस्त मंगळा पटेकर, लहू ढगे यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, तहसीलदार सतीश थेटे, धर्मादाय आयुक्त यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले असे, की घोरपडा देवी देवस्थानच्या संशयास्पद कामकाजाबाबत आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या. परंतु दखल घेतली जात नाही. ३ जुलै २०२२ रोजी अकोले तहसील कार्यालयत उपोषणास बसणाार असल्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु संचारबंदी लागू असल्याने उपोषणास बसता येणार नसल्याने राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगून उपोषण न करण्याबाबत विनंती केली, त्यावरून उपोषण मागे घेतले.

सदरची बाब ही धर्मादाय आयुक्त यांचेकडे असल्याने ११ जुलै २०२३ रोजी उपधर्मादाय आयुक्त अहमदनगर यांचेकडे अहवाल सादर केला. तसेच नियमावली असल्याशिवाय कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन घ्यावयाचे नाही असे तोंडी राजूरचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी सांगितले. परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. देणगी पावत्या, गुप्तदान, नवस पूर्ती करताना भाविकांकडून मिळणारे दागदागिने यांचा हिशोब व ताळमेळ लागत नाही. काही ठराविक लोक भाविकांच्या दानावर डल्ला मारत आहे. बोगस जाहीर प्रगटन व बनावट इतिवृत्त सादर करुन ठेका देण्यात आलेला आहे असे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे भक्त निवास व पार्किंगचा ठेका चालविला जात आहे. यामुळे हरी भाऊ बांबेरे व विजय विठ्ठल वेडे या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने मंगळवारी (ता.५) तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे मंगळा पटेकर व लहू ढगे यांनी दिला आहे.

Visits: 349 Today: 1 Total: 1881230

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *