विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा विसर्ग वाढवला! प्रांताधिकार्‍यांच्या हस्तक्षेपानंतर कारवाई; निळवंडे धरणातून बाराशे क्यूसेकचा विसर्ग..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मंगळवारी भावपूर्ण वातावरणात सांगता होत आहे. परंपरेनुसार दरवर्षी गणरायांचे वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्याचा संगमनेरकरांचा प्रघात आहे. त्यासाठी तब्बल एकोणावीस दिवस गणरायांना घरातच बसविण्याचा प्रगल्भ इतिहासही संगमनेरकरांनी लिहिला आहे. भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणही तुडुंब भरल्याने यंदा पाण्यासाठी संघर्षाची वेळ येणार नाही अशीच काहीशी स्थिती दिसत होती. मात्र सद्यस्थितीत धरणं भरलेली असली तरीही पाऊस उघडल्याने नदीपात्रातून अवघा ८१६ क्यूसेकचा ओव्हरफ्लो सुरु आहे. त्यामुळे इतक्याशा पाण्यात विसर्जन कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी यापूर्वीच पत्रव्यवहार करुनही धरण व्यवस्थापनाने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आता संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी या विषयात लक्ष घालून निळवंडे प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क करुन विसर्जनात बाधा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देत विसर्ग वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता निळवंडे धरणातून एक हजार २०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिनी सकाळपर्यंत प्रवरेच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.

गेल्या दहा दिवस राज्यभरात तरुणाईला उधाण आणणारा गणेशोत्सव साजरा झाला असून मंगळवारी (ता.१७) बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह शहरातील अन्य मंडळे व घरगुती बाप्पांच्या विसर्जनाच्या तयारीलाही वेग आला आहे. प्रागैहासापासून संगमनेर शहरातून अमृतवाहिनी प्रवरा अव्याहतपणे वाहते. येथील सार्वजनिक गणेशोत्सवालाही १२९ वर्षांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे या उत्सवाचे आणि त्या निमित्ताने घडून येणार्‍या श्रींच्या विसर्जनाचे वाहत्या नदीशी अतूट नाते आहे. इतिहासात आजवर विसर्जनाच्या दिनी नदीपात्रात पाणी नाही अशी स्थिती निर्माण झाली नाही. मात्र २०१२ साली मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने धरणांमधील पाण्याच्या वापरावर निर्बंध आणण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने केवळ विसर्जनासाठी म्हणून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यास असहमती दर्शवली.


त्याचा परिणाम संगमनेरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी नदीपात्रात पाणी असल्याशिवाय श्रींचे विसर्जन करणार नसल्याची भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेला संगमनेरकरांनीही मोठा प्रतिसाद दिल्याने घरगुती गणपतींसह तब्बल ६० हजार गणपतींचे विसर्जन खोळंबले. यादरम्यान शासन आणि प्रशासनाशी मंडळे व त्यांच्या प्रमुखांसोबत वाटाघाटीही सुरु होत्या आणि प्रशासनाकडून सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये फूट पाडण्याचेही प्रयत्न सुरु होते. मात्र त्यातून संगमनेरकरांचा एकोपा भंग होऊ शकला नाही. त्यामुळे अखेर १८ व्या दिवशी भंडारदरा धरणातून विसर्जनासाठी पाणी सोडण्यात आले आणि त्यानंतर तब्बल १९ व्या दिवशी पितृपक्षांमध्ये संगमनेरच्या ६० हजार गणपती बाप्पांचे एकाच दिवशी विसर्जन झाले होते.

त्यानंतरही दोन वेळा तशीच स्थिती उद्भवली होती. मात्र पूर्वानुभव लक्षात घेऊन रात्री उशिराने प्रशासनाने नदीपात्रात पाणी सोडल्याने विसर्जनाच्या दिवशी उशिराने संगमनेरकरांनी नदीपात्रात जाऊन विसर्जन केल्याचेही दाखले आहेत, यंदा मात्र तशी स्थिती नाही. यावेळी उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात अक्षरशः धुमाकूळ घातल्याने या दोन्ही जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसह मराठवाड्याची तहान भागवणार्‍या जायकवाडी जलाशयालाही तुडुंब करण्याची किमया साधली. त्यामुळे यंदा समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. या दरम्यान पाणलोटात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु असल्याने विसर्जनासाठी नदीपात्रात मुबलक वाहते पाणी राहील अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या आठवड्याभरापासून लाभक्षेत्रसह पाणलोटातील पाऊसही थांबल्याने नद्यांमधील प्रवाह संकुचित झाले आहेत. म्हाळुंगी, आढळा या नद्या कोरड्या पडल्या आहेत. प्रवरा नदीपात्रातूनही अवघा ८१६ क्यूसेकचा विसर्ग सुरु असल्याने इतक्याशा पाण्यात गणेश विसर्जन कसे पार पडेल अशी शंका निर्माण झाली होती.


संगमनेरकरांचा पूर्व इतिहास लक्षात घेता शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी पदभार स्वीकारताच निळवंडे प्रकल्पाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून सद्यस्थितीत असलेल्या प्रवाहात वाढ करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांच्या पत्राला चार दिवसांचा कालावधी उलटूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी आज स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन प्रवरा उर्ध्व प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना विसर्जनादरम्यान कोणतेही अडचण निर्माण होणार नाही याबाबत सूचना करत निळवंडेतून विसर्ग वाढवण्याची सूचना केली. त्यानुसार निळवंडेतून प्रवरा नदी पात्रात आता १ हजार २०० क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील गणेश भक्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.


गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी निळवंडे प्रकल्पाच्या अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करुन नदीपात्रात आवश्यक तितके पाणी सोडण्याची विनंती केली होती. मात्र त्यावर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई न केल्याने प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी प्रवरा उर्ध्व प्रकल्पाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन सूचना दिल्यानंतर निळवंडेतून विसर्ग वाढवण्यात आला आहे.

Visits: 31 Today: 5 Total: 26452

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *