शाळकरी मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्षे सक्तमजुरी राहुरी तालुक्यातील घटना; विशेष जिल्हा न्यायालयाचा निकाल

नायक वृत्तसेवा, राहुरी
एका शाळकरी मुलीचा सतत पाठलाग करणार्‍याविरूद्ध त्या मुलीने धाडसाने तक्रार दिली. न्यायालयात तिने आणि आईने न घाबरता साक्षही दिली. अखेर न्यायालयाने आरोपीला 2 वर्षे सक्तमजुरी आणि दंडही ठोठावला. संदीप नानासाहेब निकम (वय 34, रा.गौतमनगर,राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी हा निकाल दिला.

राहुरी तालुक्यात 2019 रोजी ही घटना घडली होती. आरोपी निकम एका शाळकरी मुलीचा पाठलाग करून सतत त्रास देत होता. 11 एप्रिल, 2019 रोजी ही मुलगी आपल्या घराजवळच शाळेच्या बसची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने त्याचा मोबाईल नंबर तिला देत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फोन करत जा, असे सांगितले. मुलीने नकार दिल्यावर तिला वडिलांकडे खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. मात्र, नंतर मुलीने त्याच्याशी संपर्क केला नाही. त्यामुळे 30 एप्रिल रोजी आरोपी निकम पुन्हा तिच्या घरी आला. फोन का केला नाही, अशी विचारणा करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर एके दिवशी ती दुचाकीवरून जात असताना तिचा पाठलाग करून छेड काढली. त्याही पुढे जाऊन 16 मे रोजी त्याने आणखी धाडस केले. त्यादिवशी दुपारी तो मुलीच्या घरी आला. त्यावेळी तिची आईही घरी होती. त्याला घराभोवती चकरा मारताना पाहून आईने हटकले. याचा राग येऊन त्याने मुलीच्या आईलाही शिवीगाळ केली, धमकी दिली.

हा प्रकार वाढतच असल्याचे पाहून मुलगी व आईने पोलिसांत तक्रार देण्याचे ठरविले. त्यानुसार त्या राहुरी पोलीस ठाण्यात गेल्या. तेथे फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी निकम याच्याविरूद्ध विनयभंग, धमकावणे, बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा यातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी आरोपीला अटक केली. गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी अहमदनगरच्या सत्र न्यायालयात विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांचेसमोर झाली. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने चार साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, पीडित मुलीची आई, पंच व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा तसेच विशेष सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा दिली.

Visits: 110 Today: 1 Total: 1101343

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *