अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत विनयभंग! जमजम कॉलनीतील प्रकार; मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
टी.व्ही व मोबाईलच्या वाढत्या प्रभावाने बेफाम झालेल्या तरुणांकडून गल्लोगल्ली महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसत असून अलिकडच्या काळात अल्पवयीन मुलींनाच गळाला लावण्याचे धक्कादायक प्रकार समोर येवू लागले आहेत. या साखळीत सोमवारी सायंकाळी आणखी एका घटनेची भर पडली असून भारतनगर परिसरात राहणार्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करणार्या फरदीन शेख याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.22) सायंकाळी सातच्या सुमारास जमजम कॉलनी परिसरात घडली. या घटनेत परिसरात राहणारी एक 15 वर्षीय मुलगी आपल्या ओळखीच्या एका विवाहित जोडप्यासह तेथून जात असतांना त्यांच्या पाठलाग करीत आलेल्या आरोपी फरदीन शेख याने ‘त्या’ मुलीची मोपेड आडवून ‘तु मला फार आवडतेस’ असे म्हणत तिला लज्जा उत्पन्न हाईल असे कृत्य केले.
अचानक घडलेल्या या प्रकाराने सुरुवातीला काहीशा घाबरलेल्या त्या मुलीने नंतर आराडाओरड केल्याने घाबरलेला आरोपी तेथून सुसाट वेगाने पळून गेला. ही घटना संबंधित पीडितीने घरी जावून आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर आज (ता.23) दुपारी सव्वाचारच्या सुमारास पीडितेने आपल्या आईसह पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या कानावर घातला. त्यांनी तत्काळ पीडित मुलीची तक्रार घेत आरोपी फरदीन शेख (रा.जमजम कॉलनी) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले नाही.