निळवंडे कालव्यातील पाझर थांबविण्यासाठी पुढील नियोजन कधी? जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ यांनी विचारले सवाल


नायक वृत्तसेवा, राहाता
निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची पाणी सोडण्याची चाचणी झाली. यातून पाण्याचा पाझर झाला याची झळ अकोल्यातील शेतकरी वर्गाला बसली. पण आता हा पाझर थांबविण्यासाठी पुढील नियोजन कधी करणार असा सवाल जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ यांनी केला आहे.

निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची चाचणी नुकतीच पार पडलेली आहे. पाणी मुख्य कालव्याच्या अंतिम भागापर्यंत पोहचले आहे. परंतु या चाचणी दरम्यान अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात सुरुंगाने फोडलेल्या खडकातून मोठ्या प्रमाणात पाझर होऊन शेती व घरात पाणी शिरले. या पाझरामुळे नुकसान झाल्याने स्थानिक शेतकर्‍यांनी कालवा बंद करण्यासाठी आंदोलने केली. त्यामुळे या भागातील निळंवडे डाव्या कालव्याच्या काँक्रिट अस्तरीकरणाचे काम तातडीने सुरु करणे गरजेचे आहे. बोगद्यात पाण्याचा व्यय मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिथेही प्राधान्याने अस्तरीकरण होणे अपेक्षित आहे. त्या संदर्भातील अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया तातडीने राबवून पावसाळा संपल्यानंतर ही कामे तातडीने हाती घेणे अत्यावश्यक आहे. कामे कमी वेळेत होण्यासाठी कामाचे भाग पाडून जादा ठेकेदार नेमणे आवश्यक आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्यास निळवंडे कालव्यात पुन्हा पाणी सोडण्याच्या वेळी स्थानिक शेतकर्‍यांकडून विरोध होऊन ऐनवेळी अडचणी उद्भवतील.

कालव्याच्या पाणी नियंत्रणासाठी द्वार नियंत्रक दरवाजे, अतिवाहके यांची कामे होणे आवश्यक आहे. परंतु जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडून तसेच मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेकडून याबाबत गेले वर्षभर टोलवाटोलवी चालू असल्याने ती कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. क्षेत्रीय पातळीवर हा विषय सुटेल याची शक्यता दुरावली आहे. त्यामुळे हा विषय वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने घेऊन सर्व संबंधितांच्या समन्वयाने मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. दरवाजे नसल्याने कालवा चाचणीच्या वेळी मातीचे तात्पुरते बांध घालून वेळ मारुन नेली. परंतु मातीचे बांध शेतकरी फोडतात आणि त्यामुळे लाभधारकांमध्ये आपापसात वाद होतात व बांध फोडाफोडीमुळे पाण्याचा अपव्ययही होतो. तरी दरवाजे बसविण्यास झालेल्या विलंबाच्या कारणांची चौकशी करुन हा विषय निकाली काढणे गरजेचे आहे. पुच्छ कालव्याचे शेवटचे 2 किलोमीटर तसेच तळेगाव शाखा, कोपरगाव शाखा व निमगावजाळी निम्नस्तरीय वितरीका यांची कामे अपूर्ण असून ती तातडीने पूर्ण करावीत. निळवंडे उजव्या कालव्याचे मातीकाम व बांधकामे अद्यापही 35 टक्के अपूर्ण आहेत. यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन कामास गतीमान केले पाहिजे.

पाण्याचे वितरण करण्यासाठी जी बंद नलिका वितरण प्रणाली करणे प्रस्तावित आहे ती गेल्या सहा महिन्यांपासून सर्व्हेक्षण पातळीवरच रेंगाळलेली आहे. परिणामी त्या संदर्भातील अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया व ठेकेदार निश्चित करणे यामध्ये दिरंगाई होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने अंतिम करण्यात यावी. वितरण प्रणालीची कामे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पाणी पोहोचणार नाही. कालवा चाचणी यशस्वी झाली हे शेतकर्‍यांचे तात्पुरते समाधान ठरेल व त्यात दिरंगाई झाली तर शेतकर्‍यांमध्ये असंतोष वाढीस लागेल. जवळपास 65 हजार हेक्टर क्षेत्रावर ही वितरण प्रणाली कार्यान्वित करावयाची असल्याने हा विषय प्राधान्यक्रमात घेणे आवश्यक आहे.

Visits: 164 Today: 1 Total: 1571064

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *