धिरज मांजरे संगमनेरचे नूतन तहसीलदार! कारंजात उत्कृष्ट कामगिरी; चार दिवसांत पदभार स्वीकारण्याचे आदेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तहसीलदार अमोल निकम यांची बदली झाल्यानंतर गेल्या जवळपास महिनाभरापासून रिक्त असलेल्या संगमनेरच्या तहसीलदारपदी धिरज मांजरे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे कार्यरत होते. साडेतीन वर्षांच्या तेथील कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत राज्य सरकारने त्यांना गेल्यावर्षीचा ‘उत्कृष्ट तहसीलदाराचा’ पुरस्कार देवून गौरविले होते. अमरावती महसुली विभागातून गेल्या महिन्यात त्यांची बदली झाल्यानंतर त्यांना आता नाशिक विभागात पाठविण्यात आले असून 11 मे पूर्वी संगमनेरचा पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे.


मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवाशी असलेल्या धिरज मांजरे यांनी कारंजा (जि.वाशिम) येथील साडेतीन वर्षांच्या कारकीर्दीत उत्कृष्ट काम केले. कोविड संक्रमणाच्या कालावधीत विविध सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांना विश्‍वासात घेवून त्यांनी केलेले काम आजही तेथील लोकांच्या स्मरणात आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा सन्मान म्हणून शासनाने त्यांना ‘उत्कृष्ट तहसीलदार’ म्हणूनही गौरविले होते. वृक्ष व पर्यावरण या दोन विषयांची त्यांना प्रचंड आस्था असून हरित पृथ्वी या संकल्पनेवर त्यांनी काही खासगी संघटनांच्या माध्यमातूनही काम केले आहे.


कसलेला प्रशासक आणि हळव्या मनाचा अधिकारी अशी वेगळी ओळख असलेल्या धिरज मांजरे यांनी कारंजात केलेल्या कामाने प्रत्येकाला आपलेसे केले होते. त्याचाच परिणाम त्यांची बदली झाल्यानंतर कारंजाकरांनी त्यांचा नागरी सत्कार करतांना त्यांची घोड्यावरुन मिरवणूकही काढली होती. त्यावेळच्या कार्यक्रमात कारंजातील व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी भावना करतांना त्यांना दबंग व समाजाविषयी कळवळा असलेला अधिकारी अशाही उपाध्या दिल्या होत्या.


आता अमरावती महसुल विभागातून त्यांची नाशिक विभागात बदली झाली असून संगमनेरसारख्या नेहमी चर्चेत असलेल्या तालुक्याच्या तहसीलदारपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. तरुण अधिकारी असलेले धिरज मांजरे संगमनेरातील आपल्या कारकीर्दीत आजी-माजी महसूलमंत्र्यांमध्ये कसा समतोल साधतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Visits: 255 Today: 1 Total: 1419811

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *