संगमनेरचे वैभवशाली बसस्थानक प्रवाशांसाठी असुरक्षित! पोलिसांची निष्क्रियता; दागिने व रोकड लांबविण्याच्या सातत्यपूर्ण घटना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील प्रशस्त व देखण्या बसस्थानकांमध्ये गणले जाणारे संगमनेर बसस्थानक शहर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे प्रवाशांसाठी असुरक्षित बनले आहे. दिवसरात्र मोठी वर्दळ असलेल्या या स्थानकात गेल्या काही वर्षात सातत्याने प्रवाशांचे दागिने व रोकड लांबविण्याच्या घटना घडत आहेत. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यात एकाही पोलीस अधिकार्‍याला यश आलेले नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी येथील बसस्थानकात ‘पोलीस चौकी’ही उभारण्यात आली आहे, मात्र आजवर त्याचा कोणताही फायदा झाल्याचे ऐकीवात नाही. पोलिसांच्या याच निष्क्रियतेचा पुरेपूर लाभ घेत चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून रविवारी दोघांच्या गळ्यावर हात साफ करीत लाखो रुपयांचे दागिने लांबविण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी एकाच तक्रारीत दोघांच्या घटनांचा उल्लेख करीत चक्क सोन्याचा दर 15 हजार रुपये तोळा ठरविल्याने या घटनेचे गांभीर्यच कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे आपली निष्क्रियता पत्रकारांपर्यंत पोहोचू नये यासाठी येथील अधिकार्‍यांनी सर्व कर्मचार्‍यांना गुन्ह्यांची माहिती न देण्याची ‘तंबी’ भरल्याचेही कानी आले आहे.

याबाबत महद् प्रयासाअंती चक्क फिर्यादीकडूनच मिळवाव्या लागलेल्या माहितीनुसार सदरच्या दोन्ही घटना रविवारी (ता.7) भरदिवसा 10 वाजता घडल्याचे समोर आले. यावेळी मेहरमळा परिसरात राहणारे बद्रीनारायण लोहे हे गृहस्थ गावी जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकात आले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी आणि त्याला लावलेले पदक अगदी बिनधास्त लांबविले. या प्रकाराने भांबावलेल्या लोहे यांनी आरडाओरड केली असता तसाच प्रकार आणखी एका वृद्ध महिलेच्या बाबतीतही घडल्याचे त्यांना समजले.

पठारभागातील पिंपळगाव माथा या आदिवासी बहुलभागात राहणार्‍या शांताबाई काशिनाथ सावंत ही वयोवृद्ध महिला गावाकडे जाणार्‍या बसची वाट बघत असताना अज्ञात चोरट्याने डाव साधला. या घटनेत चोरट्याने त्यांची पिशवी लांबवून त्यात ठेवलेली सोन्याची नथ आणि सोन्याचे हातकडे (ब्रासलेट) घेवून पोबारा केला. हा प्रकार समोर आल्यानंतर जबर धक्का बसलेल्या त्या वृद्ध महिलेला अश्रू अनावर झाले. आसपासच्या अन्य प्रवाशांनी त्यांना पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल करण्यास सांगितल्यानंतर मोठ्या आशेने त्या पोलीस ठाण्यात गेल्या.

मात्र पोलिसांनी आपली लक्तरं झाकण्यासाठी त्यांची स्वतंत्र फिर्याद नोंदवून न घेता बद्रीनारायण लोहे यांच्या तक्रारीतच त्या महिलेची तक्रार घुसवून सोन्याचा दरही 15 हजारांवर आणला. एकाच दिवशी आणि त्यातही भरदिवसा घडलेल्या या घटनेत जवळपास पाच तोळ्यांचे अडीच लाख रुपये मूल्य असलेले दागिने चोरट्यांनी ओरबाडले. प्रत्यक्षात तक्रार दाखल करतांना पोलिसांनी लोहे यांच्या दोनतोळे सोनसाखळीचा उल्लेख करताना संबंधित महिलेच्या दागिन्यांचे वजन मात्र टाळले. त्यातही कहर म्हणजे या दोन्ही घटनांत जवळपास पाच तोळ्याचे दागिने चोरीला जावूनही केवळ त्याची रक्कम 65 हजार रुपये दाखवण्यात आली.

गेल्या काही दिवसांत संगमनेर बसस्थानकातून प्रवाशांच्या गळ्यातील दागिने, पर्स लांबविण्याच्या सातत्यपूर्ण घटना घडत आहेत. वर्दळीच्या ठिकाणी अशा घटना घडण्याची नेहमीच शक्यता असल्याने प्रत्येक बसस्थानकात पोलीस चौकी असते व तेथे 24 तास पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्तीही होते. वैभवशाली स्थानकाची शेखी मिरवणारे संगमनेरचे बसस्थानक मात्र त्याला अपवाद ठरले आहे. या स्थानकात पोलीस चौकीसाठी प्रशस्त जागातर आहे, मात्र तेथे कधीही पोलीस कर्मचारी हजर नसतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीत संगमनेर बसस्थानकात चोरट्यांचेच साम्राज्य असून पोलीस आपले ‘कर्म’ करण्यात व्यस्त असल्याचे दुर्दैवी चित्र सध्या दिसून येत आहे.


पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून पोलिसांकडून विद्यार्थी व अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाईचा सपाटा सुरु आहे, त्यासाठी पोलिसांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उतरत असल्याचे दिसून येते. मात्र दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या आणि नियमित सोनसाखळ्या व रोकड लांबविण्याच्या घटना घडूनही संगमनेरच्या बसस्थानकाला मात्र कायमस्वरुपी पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक नसणे हा विरोधाभासी प्रकार पोलिसांविषयी संशय निर्माण करणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *