संगमनेर शहराच्या मध्यवस्तीतील काँक्रिटीकरण रेंगाळले पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडींचा बेमुदत उपोषणाचा इशारा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या मध्यवस्तीतील मुळे गल्ली व मालदाडकर गल्ली या परिसरातील काँक्रिटीकरण काम चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही अर्धवट अवस्थेत पडले आहे. हे रेंगाळलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. याबाबत आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील रहिवासी व पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पालिकेत वेळोवेळी संपर्क केला असताना दोन दिवसांत काम सुरू होईल अशी आश्वासने अनेकवेळेला दिली. मात्र प्रत्यक्ष काही झाले नाही. विकासकामे ही जनतेच्या सोयीसाठी असतात गैर सुविधेसाठी नाही, अशी कडक टीका जाखडी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नुकतेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कार्यालयात संबंधित अधिकार्यांची भेट घेतली व त्यांना हे इशारेवजा निवेदन सादर केले. मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने नगरपालिकेच्यावतीने प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांनी निवेदन स्वीकारले. सुमारे चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्याच्या नावाखाली मुळे गल्ली मालदाडकर गल्ली येथील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले. येथील नागरिकांची कोणतीही तक्रार नसताना अद्यापही काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना प्रचंड मनःस्ताप सोसावा लागत आहे. सर्व रस्ते उंच-सखल झाले आहेत. त्यावर दगड-गोटे पडलेले असल्याने जीव मुठीत धरुन नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, वयोवृद्ध लोकांना ये-जा करावी लागते.
या खराब रस्त्यांमुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांना आपल्या घरापर्यंत वाहने घेऊन जाता येत नाहीत. घरापासून दूर वाहने लावण्यात येत असल्याने त्यांची सुरक्षितताही धोक्यात आलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून नगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला कडक शब्दांत समज देऊन काँक्रिटीकरणाचे रेंगाळलेले, रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे. अन्यथा आमच्यासमोर उपोषणाशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही असे पत्रकात शेवटी म्हटले आहे. जाखडी यांच्या उपोषणाच्या इशार्याला मालदाडकर गल्ली व मुळे गल्ली परिसरातील अनेक माता-भगिनी यांनीही पाठिंबा दिला असून जाखडी यांच्यासोबतच आम्हीही उपोषणाला बसू असे म्हटले आहे.