बोटा शिवारात बिबट मादी पिंजर्यात जेरबंद

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा शिवारात बुधवारी (ता.24) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेली दोनवर्षीय बिबट मादी अलगदपणे पिंजर्यात जेरबंद झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

बोटा गावठाणात गेल्या काही दिवसांपासून बिबट मादीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. शेतकर्यांच्या कोंबड्या या मादीने फस्त केल्या होत्या. त्यामुळे येथे पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानंतर वन विभागाने पिंजरा लावत भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवल्या होत्या. बुधवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात असणारी मादी अलगदपणे पिंजर्यात जेरबंद झाली आहे. ही माहिती काही नागरिकांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे, वनरक्षक दिलीप उचाळे, वनसेवक बाळासाहेब वैराळ यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर सरकारी वाहनातून या बिबट मादीला चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात आणण्यात आली.
