धक्कादायक! शिर्डीला आलेल्या शंभर विद्यार्थ्यांना विषबाधा साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू; सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर


नायक वृत्तसेवा, शिर्डी
जगप्रसिद्ध तीर्थस्थान असणार्‍या साईबाबांच्या शिर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीहून शिर्डीत आलेल्या जवळपास शंभर विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचारार्थ साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूलचे 227 विद्यार्थी दोन दिवसांपासून सहलीसाठी आलेले आहे. शिर्डीत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण केले. त्यानंतर साईबाबांचे दर्शन घेतले. रात्री देवगड येथे मुक्कामी निघाले असताना विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. यातील काही विद्यार्थांना अधिक त्रास जाणवत होता. त्यामुळे शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

यातील काही मुलांना ताप, थंडी सारखे प्रकार देखील दिसून आले. त्यामुळे खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखीखाली ठेवले आहे. मुलांची प्रकृती सध्या स्थिर असून सर्व बाधित मुलांना सध्या रुग्णालायत दाखल ठेवले आहे. तसेच सहलीतील काही शिक्षकांना देखील विषबाधा सारखी लक्षणे जाणवल्याने त्यांनाही उपचारांसाठी दाखल केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी बाहेर कुठे काही खाल्ले नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. जेवण तयार करण्याची सर्व सामुग्री सोबतच असल्याचे समजते. तर पाणी बदलामुळे उलट्या सुरु होवून फूड पॉयजनिंगसारखा प्रकार असल्याचे शिक्षक सांगत आहेत.

Visits: 282 Today: 3 Total: 2058549

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *