चंदनापुरीच्या पालकांकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल केला सुनील ढेरंगेंचा सन्मान


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे व प्रगत गाव असलेल्या चंदनापुरी गावातील पालकांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील उपक्रमशील शिक्षक सुनील ढेरंगे यांना त्यांच्या आतापर्यंत शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल विद्यार्थी व पालकांच्यावतीने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मानचिन्ह देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने पालक मेळाव्यात गौरविले.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील भालेराव, सदस्य सतीश रहाणे, दगू रहाणे, उज्ज्वला रहाणे, सीमा भालेराव, गौतम भालेराव, किरण रहाणे, नीलेश राहाणे, सचिन रहाणे, हरिभाऊ रहाणे, सोपान रहाणे, वैशाली रहाणे, स्वाती रहाणे, सुनीता रहाणे, पूनम रहाणे, वच्छला पवार, हिराबाई सातपुते, कावेरी वाकचौरे, भाऊसाहेब रहाणे, सुरेखा रहाणे, संदीप वाकचौरे, सविता भालेराव, उज्ज्वला रहाणे, दत्तू रहाणे, नाना रहाणे, सुखदेव कढणे, लहानू रहाणे, अमोल रहाणे, प्रकाश रहाणे, बाबासाहेब रहाणे, सुरेखा भालेराव, सुजाता वाघ यांसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भालेराव म्हणाले, आमच्या गावात एखाद्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिक्षक सुनील ढेरंगे यांनी शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. कोरोना काळात सर्व शाळा बंद झाल्या. आमच्या शाळेत तालुक्यातील पहिला ऑनलाईन क्लास सरांनी सुरू केला. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडला नाही. आजही मुलांची शैक्षणिक प्रगती उत्तम आहे. म्हणून पालकांनीच नियोजन करून आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्याचे ठरवले.


प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजू रहाणे म्हणाले, ढेरंगे यांनी यापूर्वीच्या माळवाडी, लिंगदेव, बांबळेवाडी, करपडवस्ती, निमगाव पागा या शाळांमध्येही विविध उपक्रम राबवले आहेत. आपल्या शाळेत उत्कृष्ट लेझीम पथक तयार केले असून विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची सतत तालुका पातळीवर निवड होत आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. शाळेतील सर्व शिक्षकांना बरोबर घेऊन ते काम करत असल्याने शाळेची प्रगती उत्तम आहे. शाळेतील विद्यार्थी अभिनव रहाणे, श्रद्धा रहाणे, समृद्धी भालेराव यांनी आमचे शिक्षक आम्हांला हसत खेळत शिकवतात. आम्ही चौथीत शिकत असून आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. सध्या आम्ही पाचवीचा अभ्यास करत आहोत, असे मनोगतातून सांगितले.

गौतम भालेराव म्हणाले, कोरोना काळात ढेरंगे यांनी घेतलेल्या ऑनलाईन क्लासमुळे मुलांची उत्तम शैक्षणिक प्रगती झाली आहे. ढेरंगे यांच्या वर्गातील मुलांची प्रगती खूप छान आहे. त्यांना पालकांनी दिलेला पुरस्कार हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम आनंदाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी काढले. सत्काराला उत्तर देतांना सुनील ढेरंगे म्हणाले, शिक्षकाचे मूल्यमापन विद्यार्थी व पालक करत असतात. त्यांनी दिलेला पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तसेच माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे असे मी मानतो. यावेळी सयाजी रहाणे, प्रदीप रहाणे, एस. एम. रहाणे, सचिन रहाणे आदिंनी आपल्या मनोगतातून ढेरंगे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी मुख्याध्यापिका वंदना सातपुते, उमा पाटील, उषा म्हसे, कविता काकडे, अनिता मालुंजकर, मीनाक्षी काकड, शैलजा पोखरकर, किरण फटांगरे, शिल्पा भालेराव, सुरेखा रहाणे, लता वाकचौरे, रजिया नदाफ, मंदा वाकचौरे यांचा देखील सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन किरण फटांगरे यांनी केले तर मुख्याध्यापिका वंदना सातपुते यांनी आभार मानले.

Visits: 11 Today: 1 Total: 115012

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *