आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याचे घोडे अडले कुठे? रस्त्याच्या उद्घाटनास वर्षपूर्ती; अजूनही कामाला मुहूर्त मिळेना

नायक वृत्तसेवा, राहुरी
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे सात कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या हस्ते व युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे वर्षभरापूर्वी आंबी (ता. राहुरी) येथे संपन्न झाले होते. यात आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले होते. मात्र अजूनही प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसून, नेमके घोडे अडले कुठे असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

अत्यंत वर्दळ असलेल्या आंबी ते देवळाली प्रवरा या एक किलोमीटरच्या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे वर्षभरापूर्वी मोठ्या थाटात उद्घाटन झाले. यासाठी आमदार लहू कानडे यांनी तब्बल 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र या रस्त्याच्या उद्घाटनाला तब्बल एक वर्ष उलटूनही प्रत्यक्षात कामाला अजूनही सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. यावरुन रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी कुठे गायब तर झाला नाही ना? ठेकेदाराला प्रत्यक्ष कामाला अजून मुहूर्त मिळाला नाही का? सरकार बदलल्यामुळे या रस्त्याला स्थगिती मिळाली का? या रस्त्याचा निधी इतरत्र वापरला गेला का? असे सवाल नागरिकांना पडले आहे.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने नागरिक व प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यात गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर सदर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याचे प्रत्यक्ष काम एक वर्षांपासून रखडले असले तरी मजबुतीकरण व डांबरीकरण काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमदार लहू कानडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल अशी आशा आहे.
– विजय डुकरे (उपसरपंच, आंबी)

उद्घाटनाच्या फलकाला फुटले पाय?
आमदार लहू कानडे यांच्या हस्ते आंबी ते देवळाली प्रवरा या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण उद्घाटनाचा साक्ष देणारा व आमदार कानडे यांनी स्वतः फीत कापलेला माहिती देणारा फलक ‘गायब’ झाल्याने या फलकला पाय फुटले की कोणी गायब केला? का रस्त्याला ‘स्थगिती’ तर मिळाली नाही ना? या चर्चांना उधाण आले आहे.
