शिर्डी पोलिसांनी काही तासांतच खुनाचा गुन्हा केला उघड पोहेगावमध्ये बंधार्‍यात आढळला होता तरुणाचा मृतदेह


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील पोहेगावच्या बाजारतळाजवळील डोर्‍हाळे रस्त्यालगत असलेल्या बंधार्‍यात रविवारी (ता.1) सकाळी 11 वाजेच्या पूर्वी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठविला होता. या घटनेची फिर्याद पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली होती. त्यावरुन अज्ञात आरोपींविरोधात भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून काही तासांतच गंभीर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

मयत सोमनाथ शंकर कल्लारे (वय 33, रा. रांजणगाव, ता. राहाता) मित्रांसमवेत खटकळी येथे रात्रीच्या वेळी वाढदिवसाची पार्टी करत असताना मयताने एकाचा मोबाइल घेऊन मारहाण केली. तो निघून गेला. मात्र इतर मित्रांनी का त्रास देतो असे म्हणत असताना झालेल्या मारहाणीत मयत जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. 31 डिसेंबरला मृतदेह दोन दुचाकींवरुन गोणीत बांधून पोहेगाव येथे फेकून देण्यात आला. या खुनात संशयित म्हणून दिनेश फुलचंद बनसोडे (वय 22), सचिन उत्तम पवार (वय 22), प्रशांत बाळासाहेब गायकवाड (वय 22), सिद्धांत प्रमोद निकाळे (वय 20, सर्व रा. राहाता) या चौघांना शिताफीने पकडण्यात आले असून आणखी संशयितांचा शोध सुरू आहे.

या खुनात जो मयत आहे त्याच्यावर लोणी, राहाता पोलिसांत 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेले 4 आरोपी व पसार असलेले 3 आरोपींवर राहाता-शिर्डीसह विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यांत मोटरसायकल चोरी आणि विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, संभाजी पाटील, अंजय अंधारे, नितीन शेलार, सूर्यकांत ढाके, संदीप गडाख, राजवीर बिरदवडे यांनी काम पाहिले. गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या पथकाने आरोपींचा तत्काळ शोध लावल्याबद्दल त्यांच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

Visits: 160 Today: 2 Total: 2062186

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *