राहुरी कोविड केअर सेंटरमधील कोरोना तपासणी थंडावली

राहुरी कोविड केअर सेंटरमधील कोरोना तपासणी थंडावली
किट उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची हेळसांड; खासगीत मोठा खर्च
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शासनाच्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाची तपासणी सध्या थंडावली आहे. मागील तीन दिवसांपासून रोज तीस किट उपलब्ध होत असल्याने, गरजूंना अहमदनगर येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी जावे लागत आहे. कोरोना तपासणी होत नसल्याने, गरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार मिळत नसल्याने रुग्णांची हेळसांड सुरू झाली आहे.


राहुरी कृषी विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटरमध्ये रोज दीडशे ते दोनशे जणांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या जात होत्या. अँटीजेन चाचण्यांच्या किट संपल्याने, आठ दिवसांपासून घशातील स्त्राव घेऊन तपासणी केली जात होती. परंतु, मागील तीन दिवसांपासून रोज फक्त तीस जणांची स्त्राव तपासणी केली जात आहे. खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले पंधरा ते वीस जण रोज तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीसाठी पुन्हा खासगी प्रयोगशाळेत मोठा खर्च करावा लागत आहे.


विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण खासगी दवाखान्यात जातात. त्यांना थंडी, ताप, खोकला असल्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिक कोरोनाची तपासणी करण्यास सांगत आहेत. त्यामुळे कोरोना तपासणी करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाची मोफत तपासणी सेवा थंडावल्याने, रुग्णांची ससेहोलपट सुरू झाली आहे.


कोरोना चाचणी करण्यासाठी रोज शंभर किटची मागणी केली आहे. मात्र अँटीजेन चाचण्यांच्या किट संपल्या आहेत. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातही सध्या कोरोना किटचा तुटवडा आहे.
– डॉ.नलिनी विखे, (तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी)

Visits: 80 Today: 1 Total: 1113333

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *