भोकरला दीड वर्षापासून होतोय दूषित पाणी पुरवठा स्वच्छ पाणी द्या; अन्यथा एकलव्य संघटनेचा उपोषणाचा इशारा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील भोकर गावास गेल्या दीड वर्षापासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरू असून हा पाणी पुरवठा बंद करून टाकळीभान टेलटँक येथील विहिरीतील स्वच्छ व शुद्ध पाणी द्या. अन्यथा 27 ऑगस्टपासून श्रीरामपूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा एकलव्य संघटनेने निवेदनाद्वारे नुकताच दिला आहे.

भोकर गावालगत असलेल्या गावतळ्याजवळील बारवेतून पिण्यासाठी नळपाणी पुरवठा योजनेद्वारे गावास पाणी पुरवठा केला जातो. ही बारव गावतळ्यालगत असल्याने अनेकदा गावतळ्यातील अशुद्ध पाणी थेट बारवेत उतरून पाणी दूषित होते. गावतळ्याच्या चहुबाजूने बेशरम, वेड्या बाभळी व पाणगवत वाढले आहे. त्याचबरोबर गावात धुणवटा नसल्याने अनेक महिला या गावतळ्यातच आपलं धुणं धुतात. त्यामुळे गावतळ्यातील पाणी दूषित झालेे आहे.

येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तोंडी तक्रारी केल्या. परंतु त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे गावात आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदरचे पाणी पिण्यास योग्य नसतानाही ग्रामस्थांना या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. सध्या कोरोना सारख्या महामारीचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यातच या दूषित पाण्यामुळे नागरिकांना फारच त्रास होत आहे. यामुळे लहान बालके, वृद्ध, पुरूष व महिला आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही झाली नाही किंवा शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू केलेला नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत टाकळीभान टेलटँक येथील विहिरीतील शुद्ध व स्वच्छ पाण्याचा गावास पुरवठा न केल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर एकलव्य संघटनेचे शाखाध्यक्ष दीपक बर्डे, उपाध्यक्ष राजू लोखंडे, सचिव सर्जेराव आहेर, सदस्य लहानू मोरे, विठ्ठल आहेर व महेश पटारे आदिंच्या सह्या आहेत. गावास स्वच्छ व शुद्ध पाणी देण्यासाठी ग्रामपंचायतीने दोन महिन्यांपूर्वी सुमारे सात लाख रुपये खर्चून स्मशानभूमीजवळ नवीन विहीर खोदाई केली. परंतु त्या विहिरीस अपेक्षित पाणी न लागल्याने आज तरी तो खर्च वाया गेलेला दिसत आहे. त्यामुळे सध्यातरी या गावतळ्यालगतच्या बारवेतील अशुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू आहे. मध्यंतरी या बारवेला पडलेल्या भगदाडातून गावतळ्यातील अशुद्ध पाणी थेट बारवेत उतरत होते, त्यावेळी ग्रामपंचायतीने अशोकचे माजी संचालक खंडेराव पटारे यांचेकडून बदली पाणी घेऊन त्यांच्या विहिरीतील शुद्ध पाण्याचा काही महिने पुरवठा केला होता. टेलटँक किंवा मुठेवाडगाव पाझर जलावातून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे गावातील 3 व 4 या प्रभागांसाठी पाणी आणण्याचे नियोजन सुरू आहे. परंतु तरीही तात्पुरत्या स्वरूपात तातडीने गावालगत विहीर असलेले उपसरपंच महेश पटारे व त्यांचे बंधू संजय पटारे यांच्या विहिरीतून स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करणार आहे. त्या दरम्यान तातडीने भूजल विभागाच्या सूचनेनुसार बोअर घेऊन ते पाणी गावास पुरवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे यांनी सांगितलेे.

Visits: 54 Today: 1 Total: 434073

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *