मराठा समाज बांधवांचा संगमनेर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
मराठा समाज बांधवांचा संगमनेर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही. या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याने मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज व सर्व मराठा संघटनांच्यावतीने आज (सोमवार ता.5) तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. यावेळी हलगी-तुतारीच्या पारंपारिक नादात ‘आरक्षण आमच्या हक्काचं-नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा-लाख मराठा’ अशा घोषणांसह छत्रपती शिवरायांचा जयघोष करत शासनाचे लक्षे वेधले.
या धडक मोर्चावेळी मराठा बांधवांनी एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या नियंत्रणाखालील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये 12 टक्के जागा मराठा विद्यार्थ्यासाठी वाढवाव्यात, मराठा आरक्षणास स्थगिती असेपर्यंत पोलीस भरती व इतर कोणतीही सरकारी, निम्नसरकारी नोकर भरती करण्यात येऊ नये, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्याशिवाय एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नयेत, 11 ऑक्टोबर, 2020 रोजी व नजीकच्या काळात होत असलेल्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा, मराठा समाजास ईडब्ल्यूएसमध्ये नव्हे तर हक्काचे स्वतंत्र आरक्षण मिळावे, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती आदेश देणेपूर्वी सुरु झालेल्या शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती प्रक्रियांमध्ये मराठा समाजातील प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या व लाभ देण्यात यावेत, सदर अन्यायकारक बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक, सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भरीव निधी देण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण सुनावणीस्तव घटनापीठ स्थापन करण्यासाठी आग्रही पाठपुरावा करून मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अद्ययावत वसतिगृहे तात्काळ सुरू करावीत, कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींवरील मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याचे कामकाज जलद गतीने सुरू करावे आदी मागण्या केल्या आहेत.