कातळापूरमधील 35 तरुणांचे मोबाइल हॅक; महिलांनाही पाठविले अश्लील संदेश
कातळापूरमधील 35 तरुणांचे मोबाइल हॅक; महिलांनाही पाठविले अश्लील संदेश
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याच्या आदिवासी भागातील कातळापूर येथील पन्नासपेक्षा अधिक तरुण, महिला आणि वृद्धांचे मोबाइल हॅकर्सने हॅक केले आहेत. त्यांच्या मोबाइलमध्ये घाणेरडे संदेश, अश्लील छायाचित्र, पत्नी-आई-बहीण यांच्याविषयी अश्लीत भाषेत संदेश आल्याने गावातल्या तरुणांनी एकमेकांची गच्ची धरण्याचे आणि शिवीगाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे दुसर्या गावातील काही तरुणांनी कातळापूरमध्ये येऊन एका तरुणाला चोप दिल्याने एकच खळबळ उडून संतप्त वातावरण झाले आहे.
या गंभीर प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी तरुणांनी राजूर पोलिसांकडे केली आहे. तसेच माजी आमदार वैभव पिचड यांनाही निवेदन देण्यात आले आहे. अण्णासाहेब खाडगीर, बलवान उघडे, राजू खाडगीर, सचिन गावंडे, भास्कर तातळे, भाऊसाहेब साबळे, दत्तू काठे, श्रावण काठे, वाळू धिंदळे, गोरख काठे, भरत काठे, विठ्ठल नाडेकर आदी 35 तरुणांना व काही महिलांना घाणेरडे संदेश पाठवून संबंधित हॅकर त्यांना चॅलेंज करत असून ‘तुम्हांला कुठे जायचे तिथे जा, माझे कुणीच काही करु शकत नाही’. माझे ज्ञान मला वाचवू शकते, असा संदेशही आल्या असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तक्रार दाखल करुन सायबर सेलला पाठविली आहे.