तरुणाचे आदर्शवत काम; कोरोना विधवेशी केला विवाह! देवळाली प्रवरात पार पडला विवाह; अर्बन निधी संस्थेने केली मदत

नायक वृत्तसेवा, राहुरी
कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवांना सरकारने मदत करावी, यासाठी विविध संघटना कार्य करीत आहेत. सरकारकडून काही योजनाही जाहीर होत आहेत. मात्र, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका तरुणाने त्याही पुढे जात आदर्शवत काम केले आहे. नऊ महिन्यांचे बाळ असलेल्या एका विधवा महिलेशी या अविवाहित युवकाने लग्न करून तिला आयुष्यभराचा आधार दिला आहे. किशोर राजेंद्र ढूस असे त्याचे नाव आहे. त्याचे परिसरात मोठे कौतुक होत आहे. राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्थेने या जोडप्याला भरीव मदतही केली आहे.

या भागातील एका महिलेच्या पतीचे करोनामुळे निधन झाले. त्यांना नऊ महिन्यांचे बाळ आहे. ऐन तारुण्यात अचानक संकट कोसळलेल्या या माहिलेच्या मदतीसाठी देवळाली प्रवरा येथील किशोर ढूस हा अविवाहित तरुण धावून आला. त्या महिलेशी लग्न करून बाळासह त्यांच्या स्वीकार करण्याची तयारी त्याने दर्शविली. दोन्ही बाजूंनी समंती मिळाल्यावर विवाह पार पडला. राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख, राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्था व देवळाली प्रवरा हेल्थ टीम यांनी यासाठी पुढाकार घेतला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी ढूस दाम्पत्याचा सत्कार केला. त्यांना कपडे व वस्तू भेट देण्यात आल्या. विशेष म्हणजे संस्थेतर्फे त्यांच्या बाळाच्या नावावर अकरा हजार रुपयांची मुदत ठेव ठेवत त्याची पावती त्यांना देण्यात आली. तहसीलदार शेख, रामभाऊ काळे, कमल काळे, दत्ता कडू, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, प्रशांत कराळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार शेख म्हणाले, ‘कोरोनाने प्रत्येकाला दुःख दिले. तारुण्यात पती गमावल्याचे दुःख असहाय्य आहे. मात्र किशोर ढूस यांनी या महिलेशी विवाह करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. सरकार आपल्या परीने मदत करीत आहेच, मात्र किशोर ढूस यांनी जे धाडस केले ते कौतुकास्पद आहे. नऊ महिन्यांचे बाळ असलेल्या महिलेशी विवाह करून तिला जगण्याची नवीन उमेद दिली. हा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी आहे.’

Visits: 135 Today: 1 Total: 1593255

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *