भाजपाच्या माजी पदाधिकार्‍याविरोधात अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल! राजकीय नेत्याविरोधात बहुधा पहिल्यांदाच गंभीर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बाजारतळावर खारी-टोस्ट विक्रीचे दुकान लावणार्‍यास तेथून दुकान काढायला लावून जातीवाचक शिवीगाळ व दमबाजी करणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या माजी पदाधिकार्‍याविरोधात अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा प्रकार रविवारी दुपारी तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारात घडला असून या प्रकरणी घुलेवाडीतील तीस वर्षीय तरुणाच्या फिर्यादीवरुन आज पहाटेच्या सुमारास भिमराज चत्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार तालुक्यातील घुलेवाडी येथील तीस वर्षीय तरुणाचा खारी-टोस्ट विक्रीचा फिरता व्यवसाय आहे. ठिकठिकाणचे बाजार, यात्रा करुन उदरनिर्वाह करणार्‍या या तरुणाने रविवारी (ता.4) नांदुरी दुमाला येथील बाजारतळावर आपल्या मारुती ओमनी या वाहनातच सजवलेले दुकान थाटले. मात्र काही वेळातच तेथील रहिवासी व भारतीय जनता पार्टीचे माजी पदाधिकारी असलेल्या भिमराज चत्तर यांनी त्या तरुणाला तेथून दुकान काढण्यास सांगीतले.


त्या तरुणानेही काढतो म्हणत दुकान आवरायला सुरुवात केली, मात्र दरम्यानच्या काळात संबंधित इसमाने त्या तरुणाला शिवीगाळ व दमबाजी करीत जातीवाचक उल्लेख करुन त्या तरुणाचा अपमान केल्याचा आरोप त्याने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी या प्रकरणाची शहनिशा केल्यानंतर दुपारी साडेचार वाजता घडलेल्या या प्रकरणाचा गुन्हा आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास दाखल झाला.


संबंधित तरुणाच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी संशयीत आरोपी भिमराज चत्तर (रा.नान्नज दुमाला) यांच्या विरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3 (आर)(एस), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2014 चे कलम 3 (2)(व्हिए) सह भा.द.वी.कलम 504, 506 नुसार गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करीत आहेत.


एखाद्या राजकीय वलय असलेल्या व्यक्तिवर अ‍ॅट्रोसीटीसारखा गंभीर गुन्हा दाखल होण्याची अलिकडच्या काळातील संगमनेरातील ही बहुधा पहिलीच वेळ असावी. दिवंगत नेते बी.जे.खताळ पाटील यांचे समर्थक असलेल्या व अगदी जनसंघापासून भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेल्या एखाद्या ज्येष्ठ नेत्यावरच इतका गंभीर गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 114756

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *