नायक वृत्तसेवा, संगमनेर
खाजगी वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीची दुसरी आणि धक्कादायक बाजू आता समोर आली आहे. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या किरकोळ प्रकारानंतर दुसऱ्या गटाने नियोजनबद्ध षडयंत्र रचून त्यातील दोघांना घुलेवाडीजवळ सुनसान भागात गाठले. यावेळी पाच जणांनी कोयता, लोखंडी रॉड आणि बेसबॉल स्टिकच्या दांड्यांचा मनसोक्त वापर करीत दोघांनाही अर्धमेले होईस्तोवर मारले. विशेष म्हणजे ज्यावेळी ते दोघेही रक्ताच्या थारोळ्यात मृत्यूच्या दारात होते, त्याचवेळी मारेकऱ्यातील एकाची पत्नी शहर पोलीस ठाण्यात ‘त्या’ दोघांसह अन्य आठ जणांविरोधात तक्रार दाखल करीत होती. हा प्रकार रात्रीच पोलिसांना समजला. त्यांनी रुग्णालयात जावून त्यांची भेटही घेतली, मात्र दोघेही आज दुपारी शुद्धीवर आल्याने पोलिसांनी रुग्णालयात जावून त्यांचा जवाब नोंदविला. त्यावरुन पाच जणांवर खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक शस्त्रांचा वापर करुन हल्ला करण्यासह दंगलीच्या कलमान्वये पा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यातील दोघांना रात्रीच ताब्यात घेतले होते. आता गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर पहिल्या प्रकरणातील मुख्य आरोपी वरद लक्ष्मण लोहकरे याला आज दुपारीच अटक करण्यात आली आहे. या घटनेतून जनतामधील रहिवाशांना ‘एकतर चोर वर शिरजोर’ या म्हणीचा अर्थही उलगडला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आरोपी वरद लक्ष्मण लोहकरे (वय 26, रा. जनतानगर), धीरज राजेंद्र पावडे (वय 22, रा. लक्ष्मीनगर), विक्रम रामनाथ घोडेकर (वय 24, रा. घोडेकर मळा), राज ओढ (पूर्ण नाव व गाव माहिती नाही.) यांच्यासह अन्य सहा जणांनी 21 वर्षीय फिर्यादी महिलेच्या आईच्या घरासमोर त्यांचा पती व भावाला कोयता व काठ्यांनी मारहाण केली. त्या महिलेची आई व बहीण सोडवण्यास गेले असता त्यांनाही शिवीगाळ करुन घरातील सामानाची तोडफोड केली. अशा आशयाची फिर्याद शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास जनतानगर मध्ये माहेर असलेल्या विवाहितेने दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी हाणामारीच्या व दंगलीच्या कलमान्वये वरील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र ज्या वेळी ही फिर्याद लिहिली जात होती, त्याचवेळी शहर पोलीस ठाण्यापासून तीन किलोमीटर अंतरावर मात्र भलताच प्रकार घडला होता.
रात्री सव्वादहाच्या सुमारास वरील प्रकरणात आरोपी असलेले विक्रम घोडेकर व धीरज पावडे हे दोघे आपल्या मोटरसायकल वरून घुलेवाडीकडे जात असताना त्यांच्यावर आधीपासूनच पाळत ठेवून असलेल्या पाच जणांनी जवळपास निर्जन असलेल्या घुलेवाडी शिवारातील म्हसोबा मंदिराजवळ त्या दोघांनाही गाठले. यावेळी पाच हल्लेखोरांनी कोयता, बेसबॉलच्या स्टिकचे लाकडी दांडे व लोखंडी रॉडचा मनसोक्त वापर करुन त्या दोघांना अक्षरशः जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मारेकऱ्यामधील एकजण; ‘तुम्ही माझ्या बायकोला त्रास देता काय?, आज तुम्हाला संपवूनच टाकतो!’ असे म्हणतं त्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केले. त्यामुळे ते दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्याकडेला निपचित पडून राहिले. मारेकरी निघून गेल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काहींनी अपघात होऊन दोघे जखमी झाल्याचे समजून शहर पोलिसांना कळविले, काहींनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे दोघांचाही जीव वाचला.
या प्रकरणात पोलिसांनी रात्रीच पाच हल्लेखोरांमधील दोघांना ताब्यात घेतले होते. मात्र जखमी झालेले ‘ते’ दोघेही तरुण घटनेनंतर थेट आज दुपारीच शुद्धीवर आल्याने पोलिसांनी रुग्णालयात जाऊन विक्रम रामनाथ घोडेकर याचा जबाब नोंदवला. त्याने दिलेल्या वरील माहितीवरुन पोलिसांनी पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम 307, प्राणघातक शस्त्रांचा वापर करुन जीवघेणा हल्ला केल्याचे कलम 326 व बेकायदा जमाव जमवून दंगल घडविल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यातील राज उर्फ राजा गोरखा (वय 21, रा.गणेशनगर) व ओम अर्जुन वाघमारे (वय 20, रा. इंदिरानगर) या आधीच ताब्यात घेतलेल्या दोघांना आता अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.
खाजगी कारणातून वरद लोहकरे आणि संबंधित महिलेचा पती व भाऊ यांच्याशी नेहमीच वाद होत असतात. शुक्रवारी सायंकाळी देखील तसाच प्रकार घडला. मात्र यावेळी ही झंझट कायमची संपवण्याच्या उद्देशाने पाचजणांनी विचारपूर्वक षडयंत्र रचून त्यातील धीरज राजेंद्र पावडे (वय 22, रा. लक्ष्मीनगर), विक्रम रामनाथ घोडेकर (वय 24, रा. घोडेकर मळा) या दोघांना निर्जन असलेल्या महामार्गावरील म्हसोबा मंदिरासमोर गाठून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या दोघाही तरुणांना वेळीच वैद्यकीय मदत मिळाली नसती तर अनर्थ घडला असता. त्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनेला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची गरज आहे.
Visits: 30 Today: 3 Total: 114973
Post Views:
175