श्रीरामपूर बाजार समितीच्या निवडणुकीस स्थगिती नवीन अध्यादेश आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीस बुधवारी (ता.23) उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच नवीन अध्यादेश आठ दिवसांत उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार बुधवारी (ता.23) उमेदवारी अर्ज सादर करण्यास प्रारंभ होणार होता आणि 25 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार होते. यापूर्वीच श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही नवीन बदललेल्या नियमानुसार झाली पाहिजे म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यातील एक याचिका माजी सभापती दीपक पटारे व दुसरी याचिका संजय भिसे यांनी दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी होऊन राज्य सरकारने नव्यानेच बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठा बदल करत सर्वसामान्य शेतकर्यालाही बाजार समितीची निवडणूक यापुढे लढविता येणार, अशी दुरूस्ती करणारा कायदा केला.

त्यामुळे नवीन बदललेल्या नियमानुसारच बाजार समितीची निवडणूक व्हावी, म्हणजे शेतकर्यांना न्याय मिळेल, असे दीपक पटारे यांचे याचिकेत म्हणणे होते. तर दुसरी याचिका संजय भिसे यांनी ग्रामपंचायत संदर्भात दाखल केली होती. तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. त्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आत बाजार समितीची निवडणूक झाल्यास जुन्या आणि नव्या सदस्यांना संभाव्य पात्र, अपात्रतेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर बाजार समितीची निवडणूक घ्यावी, असे भिसे यांचे याचिकेत म्हणणे होते. दीपक पटारे आणि संजय भिसे यांच्यावतीने अॅड. होन आणि अॅड. ठोंबरे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. तांबे आणि अॅड. काळे यांनी काम पाहिले तर निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने अॅड. दिघे यांनी काम पाहिले. बुधवारी सकाळी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत उच्च न्यायालयाने बुधवारी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देत 8 दिवसांत नवीन अद्यादेश जारी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता नवीन अध्यादेश झाल्यानंतर त्यातील नवीन नियमाप्रमाणे निवडणुका घेण्याचे आदेश झाल्यास ही निवडणूक आणखीनच लांबणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
