बांधाच्या वादातून चौघांची महिलेला जातीवाचक शिवीगाळ साकूरच्या खंडोबामाळावरील घटना; दोन महिलांसह चौघांवर अॅट्रॉसिटीन्वये गुन्हा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाईक असलेल्या शेतीच्या बांधावरुन दोन कुटुंबात झालेल्या हमरीतुमरीचे पर्यवसान जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करण्यात झाले. यातून अनुसूचित जातीच्या महिलेला अपमानास्पद वागणूक देवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने साकूरमधील खंडोबामाळ परिसरातील चौघांवर शिवीगाळ व धमकी देण्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव करीत आहेत. यावृत्ताने तालुक्याच्या पठारभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.22) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास साकूर अंतर्गत येणार्या खंडोबामाळावर घडला. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी सदरची महिला व आपल्या मुलासह शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी भरीत असतांना बांधाला बांध असलेले शेजारील अक्षय सुरेश तमनर, सुरेश तमनर (पूर्ण नाव माहिती नाही.), तान्हाबाई सुरेश तमनर व रोहिणी अक्षय तमनर (सर्व रा.खंडोबामाळ) हे चौघे हातात कुदळी व अन्य सामग्री घेवून तेथे आले.
यावेळी या चौघांनीही काहीएक न सांगता थेट सोबत आणलेल्या कुदळीने फिर्यादी व आरोपी यांच्या जमिनीचा सामाईक बांध खोदण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेला हा प्रकार पाहून फिर्यादी महिलेने त्यांच्याकडे जावून ‘तुम्ही विनाकारण सामाईक बांध का फोडता?’ अशी विचारणा केली. त्याचा राग धरुन ‘त्या’ चौघांनीही त्यांना व त्यांच्या मुलास शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही बाजूने शाब्दीक कालवा सुरु झाल्याने आरोपींनी दरडावणीच्या स्वरात सुरु असलेल्या वादावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला. हा प्रकार सुरु असतानाच आरोपी अक्षय सुरेश तमनर याने फिर्यादी महिला व त्यांच्या मुलाला जातीवाचक शिवीगाळ करीत ‘तुम्ही **** लईच माजलेत, तुमचा बेत बघावाच लागेल..’ असे म्हणतं त्यांच्यावर अपमानास्पद शब्दांचा भडीमार केला. यावेळी आरोपीने ‘जर का तुम्ही पुन्हा आम्हाला आडवे आलात तर तुमच्या एकेकाचा मुडदाच पाडतो..’ असा दमही भरला. त्यामुळे घाबरलेली ‘ती’ महिला आणि त्यांचा मुलगा तेथून घरी निघून गेले व या प्रकारानंतर तब्बल बारा तासांनंतर घारगाव पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या कानावर घातला.
सदरील महिला अनुसूचित जाती-जमातीची असल्याने त्यांनी तत्काळ याबाबत संगमनेरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना माहिती दिली. त्यांनी फिर्यादीकडून संपूर्ण घटनाक्रम समजावून घेतल्यानंतर त्यांच्याच आदेशाने घारगाव पोलिसांनी खंडोबामाळावरील अक्षय सुरेश तमनर त्याचे वडील सुरेश तमनर, आई तान्हाबाई सुरेश तमनर व पत्नी रोहिणी अक्षय तमनर या चौघांविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 504, 506 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रॉसिटी) कलम 3 (1), (आर), 3 (1), (एस), 3 (2), (व्ही. ए) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव करीत आहेत. या वृत्ताने तालुक्याच्या पठारभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.