राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत प्रणिता सोमणला पुन्हा संधी औरंगाबाद आणि आळंदी येथील स्पर्धेत मिळवला प्रथम क्रमांक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
औरंगाबाद आणि आळंदी येथे झालेल्या टाईम ट्रायल आणि माउंटन टेरेन बाईक या सायकलिंग स्पर्धेत संगमनेरच्या प्रणिता प्रफुल्ल सोमण हिने प्रथम क्रमांक संपादन करून राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त केली आहे.

सायकलिंग क्षेत्रात प्रणिता हिने विविध स्पर्धेतून सहभाग घेवून यापूर्वीही मोठे यश संपादन केले. औरंगाबाद येथे 31 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या 20 किलोमीटर अंतराच्या टाईम ट्रायल प्रकारात प्रणिताने हे अंतर 31.48 मिनिटांत पूर्ण केले. तर आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या माउंटन टेरेन बाईक म्हणजे डोंगरातून सायकल चालविण्याच्या प्रकारात तिने 3 किलोमीटरचे अंतर 16 मिनिटांत पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला.

या दोन्ही स्पर्धेत प्रणिता सोमण हिने मिळविलेल्या यशामुळे कर्नाटक आणि मुंबई येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत तिला सहभाग घेवून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे, प्रताप जाधव, संजय धोपावरकर यांच्या मार्गदर्शनाने प्रणिता सायकलिंग क्षेत्रात यश मिळवत आहे. यापूर्वी तिने राष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून मोठे यश संपादन केले होते. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Visits: 214 Today: 1 Total: 2167581

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *