निळवंडेतील अडचणी दूर करण्यात येतील ः शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिर्डी दौर्‍यात पदाधिकार्‍यांना आश्वासन


नायक वृत्तसेवा, शिर्डी
निळवंडे कालव्यांच्या कामाकडे माझे लक्ष आहे. ठरल्याप्रमाणे कालव्यांची चाचणी घेऊन या प्रकल्पाचे लोकार्पण करता यावे, यासाठी या कामातील अडचणी दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निळवंडे कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना दिले.

शिंदे यांच्या शिर्डी भेटीत बुधवारी (ता.23) बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांच्या पुढाकारातून निळवंडे कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी शिंदे यांना निळवंडे कालव्यांच्या बंद असलेल्या कामांबाबत निवेदन दिले. स्टोनक्रशर बंद आहेत. वाळू मिळत नसल्याने कालव्यांची कामे बंद पडली. ठेकेदार कंपन्यांनी आपली यंत्रसामग्री अन्यत्र हलविली. त्यामुळे येत्या डिसेंबरअखेर कालव्यांची कामे पूर्ण होतील असे वाटत नाही, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले. त्यावर शिंदे यांनी वरील आश्वासन दिले.

यावेळी निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, दत्ता भालेराव, प्रभाकर गायकवाड, अण्णासाहेब वाघे, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या चर्चेपूर्वी जिल्हाध्यक्ष कोते यांनी शिंदे यांना जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले. त्यात शिंगवे परिसरातील शेती महामंडळाची तीनशे एकर जमीन साईसंस्थानला देण्यात यावी, श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार व्हावा, नगर ते सावळीविहीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे, समृद्धी महामार्गामुळे सभोवतालच्या गावांसमोर निर्माण झालेल्या समस्या आणि अडचणी तातडीने दूर कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *