संगमनेरातील बेकायदा हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा! नऊ जणांना ताब्यात घेवून सोडले; शहरातील उच्चभ्रू परिवारातील तरुणांचा समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आजची तरुणाई संगत दोषातून भरकट असून वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यावेळी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने थेट संगमनेरात येवून एका हुक्का पार्लरवर छापा घातला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पिण्यात दंग असलेल्या आठ जणांसह बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालणार्‍या संतोष अशोक वांढेकर अशा एकूण नऊ जणांना ताब्यात घेवून नंतर त्यांची सुटका केली आहे. या छाप्यात हुक्का पिण्यासाठी लागणार्‍या विविध साहित्यासह अकरा प्रकारच्या स्वादाच्या सुगंधी तंबाखूचे डबे असा एकूण 55 हजार 750 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात एका स्थानिक शिवसेना कार्यकर्त्याने याबाबत नियंत्रण कक्षात तक्रार नोंदविली होती, मात्र स्थानिक पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे त्यावेळी समोर आले होते.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई मंगळवारी (ता.15) रात्री साडेनऊच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील ग्रीन लीप हॉटेलशेजारील एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगरहून संगमनेरात येवून ‘त्या’ठिकाणी छापा घातला. यावेळी संगमनेर शहरातील विविध भागात राहणार्‍या उच्चभ्रू कुटुंबातील आठ तरुण वेगवेगळ्या फ्लेवरचा (चवीचा) धूर करुन सिगारेटप्रमाणे ते ओढीत असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले. त्या सर्वांना आहे त्याच स्थितीत बसण्यास सांगून पोलिसांनी सदर ठिकाणी असलेले हुक्का पिण्यासाठीचे संपूर्ण साहित्य ताब्यात घेतले.

त्यात 27 हजार रुपये किंमतीचे हुक्का पिण्यासाठीचे काचेचे व स्टीलचे भांडे, 2 हजार 600 रुपये किंमतीचे 13 रबरी पाईप, 250 रुपयांचा कांडी कोळसा, अफजल कंपनीचे पानरास, ऑरेंज व ग्रेप्स, अलअयान कंपनीचे सिग्रेचर, म्हेहरुस कंपनीचे फ्रूट ब्लेड व गोल्डन पान, इंम्पिरियल व मॉस कंपनीचे पिंक मिस्पीक, अलफर कंपनीचे मीट, अलायान कंपनीचे जाफरान पान व इक्सोटिक, रॉसल स्मोकिंग कंपनीचे किवी ब्लाँट अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या अकरा चवीच्या प्रत्येकी दोन हजार रुपये किंमत असलेल्या सुगंधी तंबाखूचे व रसायनांचे डबे, पाचशे रुपयांच्या चिलीम, हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे दोनशे रुपयांचे प्लॅस्टिकचे पाईप, तीन हजारांची वीजेरीवर चालणारी शेगडी व दोनशे रुपयांची सिल्व्हर कॉईलचा बंडल असा एकूण 55 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शंकर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी सिगारेट व तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध, व्यापारी व वाणिज्य व्यवहार उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 च्या कलम 4 व 21 (1) प्रमाणे बेकायदा हुक्का पार्लर चालविणार्‍या संतोष अशोक वांढेकर (वय 34, रा.लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी) याच्यासह बाजारपेठ, स्वातंत्र्य चौक, शिवाजी नगर, गणेशनगर, विद्यानगर, इंदिरानगर या परिसरात राहणार्‍या उच्चभ्रू आणि प्रतिष्ठीत कुटुंबातील 22 ते 36 वर्षीय तरुणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्या सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस ठाण्यात पाचारण करुन त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेले बहुतांशी तरुण उच्चशिक्षित व संगमनेरातील प्रतिथयश व्यापार्‍यांची मुले आहेत.

गेल्या आठवड्यात याच ठिकाणी काही तरुणी व तरुण हुक्का पीत असल्याची तक्रार शहरातील एका शिवसैनिकाने पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर नोंदविली होती. त्यावरुन शहर पोलीस ठाण्यातील केवळ एक कर्मचारी तब्बल दोन तासांनंतर घटनास्थळी पोहोचला होता. त्यावेळी ‘त्या’ कर्मचार्‍याने हुक्का चालविणार्‍याला सावध केल्याने तेव्हा संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र तक्रारीचा तोच धागा पकडून आता थेट अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारीत कारवाई केल्याने शहर पोलिसांकडून अशा बेकायदा ठिकाणांना आर्थिक कारणांनी पाठबळ दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Visits: 258 Today: 1 Total: 1575582

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *