डॉ.मकासरे यांना सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
नायक वृत्तसेवा, राहुरी
गुटखा तस्करी प्रकरणी राहुरी पोलिसांनी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, डॉ.विजय मकासरे यांनी गुटखा तस्करी प्रकरणी श्रीरामपूरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याविरुद्ध नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरुन गुटखा प्रकरणाचा तपास शिर्डीच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांककडे सोपविला. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील कर्मचार्याने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन मकासरे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात याची सुनावणी होऊन वास्तविक पाहता सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी डॉ.विजय मकासरे यांच्यावर आरोप केलेले आरोप हे कल्पनाशक्तीच्या बाहेरचे आहेत असल्याचे निरीक्षण नोंदविले. तसेच हा आरोप भारतीय दंड विधान कलम 353 मध्ये समाविष्ट होत नसल्याचेही सांगितले. शासकीय कर्मचार्याला शक्ती व बळाचा वापर करून कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी केलेला प्राणघातक हल्ला म्हणजे शासकीय कामात अडथळा आणणे असे नमूद केले. परंतु, डॉ.मकासरे यांनी वरील पैकी कोणतेही कृत्य केलेले नाही असे दाखल पुराव्यावरून न्यायालयाच्या निदर्शास आले. त्यावरुन मकासरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मकासरे यांच्या वतीने अॅड. बी. बी. पालवे यांनी कामकाज पहिले.
श्रीरामपूरचे तत्कालिन पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने आणि पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याविरोधात मी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केल्यामुळे माझ्यावर खोटा भादंवि कलम 353 नुसार दाखल केला आहे. सदर गुन्हा आकसबुद्धीने दाखल केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन लक्षात येते. यामुळे त्यांच्याविरोधात मी न्यायालयात जाऊन गुन्हा दाखल करणार आहे.
– डॉ.विजय मकासरे (सामाजिक कार्यकर्ते, राहुरी)