शारदा पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ.योगेश भुतडा तर व्हा.चेअरमनपदी अमर झंवर यांची निवड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ.योगेश भुतडा यांची तर, व्हाईस चेअरमनपदी अमर झंवर यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळाच्या ‘ऑनलाईन’ बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे सभासद व ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून येणार्या काळात नवनवीन संकल्पना राबविण्याचा मनोदय यावेळी उभय पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन करतांना संस्थेचे मार्गदर्शक तथा संचालक गिरीश मालपाणी यांनी कोविडच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून बाजारपेठांची अवस्था बिकट झाल्याचे सांगितले. त्यातून जगभरात आलेल्या मंदीच्या कचाट्यात व्यापारी वर्ग अडकला आहे. अशावेळी आर्थिक संस्थांची जबाबदारी अधिक असते. अघोषीत आणीबाणीच्या या स्थितीत डॉ.योगेश भुतडा व अमर झंवर यांच्याकडून संस्था, सभासद आणि ग्राहक यांच्या हितासाठी नक्कीच चांगले काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीत बोलतांना नूतन चेअरमन डॉ.भुतडा यांनी संचालक मंडळाने दाखवलेला विश्वास पूर्ण क्षमतेने तडीस नेण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. संस्थेच्या संस्थापकांनी ज्या हेतूसाठी संस्थेची स्थापना केली त्याला बांधिल राहून सभासद व ग्राहकांच्या हितासाठी नवनवीन संकल्पना राबविणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. व्हा.चेअरमन झंवर यांनीही संचालकांचा विश्वास दुणावेल अशा पद्धतीने काम करण्याचा मानस व्यक्त केला.
शारदा पतसंस्थेचे नाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात आघाडीवर आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षात संस्थेने 141 कोटी रुपयांच्या विक्रमी ठेवी संकलित केल्या. वर्षभरात 226 कोटी 73 लाख रुपयांचा व्यवसाय करतांना 85 कोटी 26 लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. कर्ज वाटप करतांना कर्जदाराची निकड, परतफेड करण्याची क्षमता आणि प्रामाणिकपणा या गोष्टींचे संचालक मंडळाकडून तंतोतंत पालन होत असल्याने संस्थेच्या थकबाकीचा आलेखही आजवर अगदीच नगण्य आहे. याच जोरावर गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने एनपीए तरतूद पूर्व तब्बल 3 कोटी 71 लाख रुपयांचा नफा मिळवित नवी भरारी घेतली होती.
सहकार उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी आर.एस.वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकारी निवडीच्या बैठकीत संचालक मंडळातील सदस्य सर्वश्री गिरीश मालपाणी, राजेश रा. मालपाणी, सुमित आट्टल, कैलास आसावा, सीए.संकेत कलंत्री, राजेश लाहोटी, रोहित मणियार, कैलास राठी, विशाल पडताणी, उमेश झंवर, सागर वाकचौरे, सोनाली नावंदर, रतिका बाहेती, जगदीश टोकसे, सोमनाथ कानकाटे, लक्ष्मीनारायण पलोड, राजकुमार पोफळे व व्यवस्थापक माधव भोर आदिंचा सहभाग होता. या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर सभासदांसाठी आयोजित झालेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीत सुवर्णा मालपाणी, राजेश व मनीष मालपाणी, प्रकाश राठी, डॉ.जुगलकिशोर भाला (जालना), शरद भाला (चिखली), सुरेखा भट्टड (सोलापूर), सुचिता झंवर (नाशिक), गणेशलाल बाहेती, अनिष मणियार, अजय जाजू, मधुसूदन नावंदर, किरण झंवर, जयप्रकाश इंदाणी, ओमप्रकाश जाजू, ओंकार बिहाणी, सीए.कैलास सोमाणी, अॅड.ज्योती मालपाणी, ज्योती कासट, प्रफुल्ल बोगावत, प्रकाश कलंत्री यांचे समवेत अहमदनगर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन सुरेश वाकळे, माजी पोलीस आयुक्त मधुकर गावित आदिंनी दोन्ही नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले आहे.