शेळकेवाडीमध्ये बिबट्याचा कारवर हल्ला

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील पठारभागात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढण्याबरोबर हल्ले वाढल्याचेही समोर येत आहे. शुक्रवारी (ता.15) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथे एका कारवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. परंतु, कारच्या सर्व काचा बंद असल्याने कारचालक तरुण बचावला आहे.

कारचालक गणेश दिलीप वाघ हा तरुण शेळकेवाडी येथून घारगावला कारमधून येत होता. त्याचवेळी शेळकेवाडी येथे रस्त्याच्यालगत असेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक कारवर हल्ला चढवता. परंतु, कारच्या सर्व काचा बंद असल्याने आणि कार वेगाने पुढे नेल्याने गणेश वाघ हल्ल्यातून बचावले आहे. या घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने दुचाकीवरुन जाणार्‍या नागरिकांवर बिबट्याने हल्ला चढविला होता. मात्र, प्रसंगावधान राखल्याने बालंबाल बचावले.

Visits: 184 Today: 2 Total: 2124163

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *