भारत जोडो यात्रेस संगमनेरमधून हजारो कार्यकर्ते रवाना आमदार थोरातांच्या नेतृत्वाखाली शेगावमध्ये सभेची जय्यत तयारी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रेमाचा व एकतेचा संदेश देत कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी संगमनेरमधील हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते व या यात्रेचे समन्वयक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेगाव येथील होणार्‍या ऐतिहासिक सभेची जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉ. तांबे यांनी दिली आहे.


संगमनेरातील यशोधन संपर्क कार्यालय येथून काँग्रेस पक्ष, पुरोगामी संघटना व इतर मित्रपक्षांचे विविध कार्यकर्ते बुलढाणा व शेगाव येथील सभेसाठी रवाना झाले. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, हिरालाल पगडाल आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी आहे. आमदार थोरात यांनी केलेल्या काटेकोर पद्धतीच्या नियोजनामुळे भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून ही यात्रा दांडीयात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार आहे. नांदेड, हिंगोल, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमधून 382 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा जात आहे. शेगाव येथे शुक्रवारी होणार्‍या सभेस अहमदनगर जिल्हा व संगमनेरमधून काँग्रेस पक्ष, पुरोगामी व इतर मित्रपक्षाचे हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील पदयात्रेत हे कार्यकर्ते सहभागी होणार असून शेगावच्या सभेसाठीही उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.

Visits: 15 Today: 1 Total: 115801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *