जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ वाढविण्याचे आव्हान! नऊ हजार लोकसंख्येच्या मागे केवळ एक ग्रंथालय


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात वाचन संस्कृती कमी होत असताना, राज्यातील अनेक ग्रंथालयांना आता उतरती कळा लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 58 सार्वजनिक ग्रंथालय अकार्यक्षम ठरले आहेत. राज्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवघे 514 ग्रंथालयाचे अस्तित्व असून त्यातील 456 ग्रंथालय ही कार्यक्षम ठरली आहेत. त्यामुळे गावोगावी ग्रंथालय चळवळ उभी करण्याचे या राज्यातील धुरीणांचे स्वप्न धुळीला मिळत असल्याचे चित्र समोर आले आहेत. ग्रंथालय सुरू करण्यासाठी तरुण मंडळी पुढे येत असली तरी अनुदान वेळेवर मिळत नसल्याने आणि नवीन ग्रंथालय अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे ग्रंथालय चालविणे ही आता दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यामुळे आहे ती वाचन संस्कृती टिकवणे हेच मोठे आव्हान ठरले आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 514 ग्रंथालय असून त्यापैकी 58 ग्रंथालय कार्यक्षम ठरले आहेत. 456 ग्रंथालयांपैकी जिल्ह्यात जिल्हास्तरीय असलेल्या अ श्रेणीतील एक ग्रंथालय, तालुकास्तरीय अ श्रेणीतील पाच, ब श्रेणीतील सहा, क श्रेणीतील तीन, इतर संवर्गातील अ श्रेणीतील तीन, ब श्रेणीतील 65, क श्रेणीतील 168, डॉ. श्रेणीतील 265 ग्रंथालय अस्तित्वात आहे, अशी जिल्ह्यात अ श्रेणीतील तील नऊ, ब श्रेणीतील 71, क श्रेणीतील 171, ड श्रेणीतील 263 ग्रंथालय अस्तित्वात आहेत.

राज्यातील ग्रंथालयांना देण्यात येणार्‍या अनुदानामध्ये गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 1970 साली राज्यांमध्ये जिल्हास्तरीय अ श्रेणीतील ग्रंथालयांना पंधरा हजार रुपये अनुदान मिळत होते आज ती रक्कम सात लाख वीस हजार रुपये पोहोचली आहे. तालुकास्तरीय ग्रंथालयांना आठ हजार रुपये अनुदान मिळत होते आता ती रक्कमतीन लाख 84 हजारांवर पोहोचली आहे. इतर अ श्रेणीतील ग्रंथालयांना सहा हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. आता 2 लाख 84 हजार रुपये दिली जातात. जिल्हा स्तरावर ब श्रेणीतील ग्रंथालयास आठ हजार रुपये अनुदान प्राप्त होते. त्यांना आता 3 लाख 84 हजार रुपये अनुदान मिळत आहे. तालुकास्तरीय ब श्रेणीतील ग्रंथालयांना सहा हजार रुपयांवरून 2 लाख 88 हजार, इतर श्रेणीतील चार हजार रुपयांवरून 1 लाख 92 हजार, तालुकास्तरीय अ श्रेणीतील ग्रंथालयांना तीन हजार रुपयांवरून 1 लाख 44 हजार, तालुकास्तरीय ग्रंथालयांना दोन हजार रुपयांवरून 96 हजार असे अनुदान मिळत आहे. इतर 500 रुपयांवरून 30 हजार रुपये अनुदान मिळत आहेत. अनुदानामध्ये गेली काही वर्ष वाढ होताना दिसत असली तरी पुस्तकांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये सर्वाधिक ग्रंथालय आहेत. ती संख्या सुमारे 74 एवढी आहेत. त्या खालोखाल नगर 64, पारनेर 62, शेवगाव 55, नेवासा 51, सर्वात कमी ग्रंथालय श्रीरामपूर तालुक्यात असून तेथे बारा ग्रंथालये आहेत. राहाता तालुक्यात तेरा व अकोले तालुक्यातील 15 ग्रंथालयांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ग्रंथालयापैकी 20 ग्रंथालये ही ग्रामपंचायतींच्यावतीने चालविण्यात येतात. त्यापैकी 12 ग्रंथालये कार्यक्षम आहेत तर, आठ ग्रंथालये ही अकार्यक्षम ठरली आहेत.

Visits: 183 Today: 1 Total: 1582411

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *