बेलापूर रस्त्यावरील घरास आग लागून चार लाखांचे नुकसान मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तूही आगीत झाल्या खाक


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिराशेजारी असलेल्या एका घराच्या वरच्या मजल्यावर बुधवारी (ता.11) सकाळी अचानक आग लागली. या आगीत 70 हजार रुपये रोख रकमेसह मुलीच्या लग्नाच्या खरेदी केलेल्या सर्व वस्तू खाक झाल्या. या आगीत सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी लोकांनी तातडीने आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

बेलापूर रस्त्यावरील महानुभाव श्रीकृष्ण मंदिराजवळ राजेंद्र एकनाथ काकडे यांचे घर आहे. काकडे हे ट्रक चालक म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी काकडे व त्यांचं कुटुंब नेहमीप्रमाणे घरात झोपलेले होते. त्यांच्या घरातील महिलेने सकाळी उठून नेहमीप्रमाणे पाणी भरून नंतर देवासमोर दिवा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या वरच्या मजल्यावर असलेल्या स्वयंपाक खोलीत अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व वस्तू खाक झाल्या. त्या खोलीत गॅसची टाकी होती. गॅसच्या टाकीने पेट घेतला मात्र मदतीसाठी आलेल्यांनी तातडीने गॅसची टाकी बाहेर फेकल्याने मोठा अनर्थ टळला. आग इतकी मोठी होती की, काकडे यांचे फ्रीज पूर्णपणे जळून गेले आहे. ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. परंतु, फ्रीजचे कॉम्प्रेसर जळाल्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काकडे यांच्या घरी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असल्याने आणि लग्नासाठी बँकेतून आणलेले 70 हजार रुपये या आगीत जळून गेले. तसेच लग्नासाठी आणलेला महागडा बस्ता तसेच महागड्या सर्व वस्तूही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यात मुलीचे लग्न 5 फेब्रुवारी रोजी असल्याने इतक्या कमी वेळेत आता कसे उभे राहणार असे म्हणत त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. या दुर्दैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 78 Today: 1 Total: 1111824

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *